जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित
गुहागर, ता. 23 : जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग प्रचंड आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व आरोग्य व्यवस्था आणि कोरोनाबाधितांची संख्या समपातळीवर आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेवून आपण जिल्ह्यात अधिक व्यवस्थांची निर्मिती करत आहोत. परंतु जनतेने हे वास्तव लक्षात घेण्याचीही आवश्यकता आहे. असे मत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत मांडले. (Online Video Conference of Honorable Ratnagiri District Collector Laxminarayan Mishra.)
कोरोनारुग्णांच्या वाढत्या आलेखाबरोबर शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजना सांगण्यासाठी आणि जिल्ह्यातील पत्रकारांकडून समस्या समजून घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी मिश्रा म्हणाले की, आज जिल्ह्यात विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेडमध्ये आपण वाढ करत आहोत. जिल्हाभरात 160 ऑक्सिजन बेड आणि 20 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था दोन दिवसांत पूर्ण होत आहे. जिल्ह्याला 12 ते 15 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज गरज भासते. आज तेवढाच ऑक्सिजन मिळण्यासाठी कोल्हापूर बरोबरच रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजन आणला जात आहे. जिल्ह्यामधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिक, वसई, विरार आदी ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुर्घटना लक्षात घेवून कोविड रुग्ण असलेल्या सर्व रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडिट दोन दिवसांत पूर्ण करण्याची यंत्रणा राबवली जात आहे. आरोग्य विभागाला मनुष्यबळाची कमतरता भासु लागली आहे. त्यामुळे तत्काळ 30 डॉक्टरांची नियुक्ती केली जात आहे. शिवाय अन्य कामांसाठी 40 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ऑक्सिजनचा थेंबही महत्त्वाचा
जिल्ह्यातील ऑक्सिजनचा साठा जेवढ्यास तेवढा असल्याने सर्व रुग्णांलयांनी रुग्णांचे परिक्षण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. खरोखरच किती जणांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्याचे मुल्यमापन या परिक्षणात होईल.
दूरध्वनी बाह्यरुग्णसेवा (Telephonic OPD)
गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांना किंवा रुग्णालयातून बरे होवून बाहेर पडलेल्या परंतु त्रास होत असलेल्या रुग्णांना घरातच मार्गदर्शन मिळावे म्हणून दूरध्वनी बाह्यरुग्णसेवा हा विभाग कार्यान्वित केला जात आहे. त्यासाठी 4 डॉक्टर आणि 4 परिचारिकांचा स्वतंत्र संच निर्माण केला जात आहे. ही टीम थेट रुग्णाशी संवाद साधुन त्याच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेल.
अंत्यंसंस्कारांसाठी स्वतंत्र टीम
कारोनाग्रस्त मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा रुग्णालय रत्नागिरीत असल्याने रत्नागिरी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम वाढत आहे. या कामाचे विलगीकरण व्हावे म्हणून प्रत्येक तालुक्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र टीमची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या टीमला आवश्यक पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येतील. प्रत्येक तालु्क्यात जिल्हा परिषद गट निहाय किंवा स्थानिक प्रशासनास योग्य वाटेल ते कार्यक्षेत्र निश्चित करुन या टीम काम करतील. सध्या ही प्रक्रिया सुरु आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने ती कार्यान्वित होईल.
रुग्ण तणावाखाली
रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढु लागल्यावर काही ठिकाणी रुग्ण तणावाखाली येत असल्याचे लक्षात आले आहे. रत्नागिरीमधील एका कोविड रुग्णालयातील रुग्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोविड रुग्णालयातील रुग्णांची मन:स्थिती ठिक रहाण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याचे अतिरिक्त काम तेथील डॉक्टरांना करावे लागत आहे.
अवाजवी बीले घेतल्यास रक्कम परत करावी लागणार
काही रुग्णालयातून कोरोना रुग्णाला सदर उपचारपध्दतीच्या बाहेर औषधे दिल्याचे दाखवून अवाजवी बीले दिली जात आहेत. तसेच रेमडिसिवर इंजेक्शनची किंमतही शासनाने ठरविलेल्या (1850 + जीएसटी) दरापेक्षा जास्त घेतली जात आहे. त्याबाबत शासनाचे धोरण काय असा प्रश्र्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देताना कोविड रुग्णावर करायच्या उपचारांसाठी शासनाने निश्चित केलेल्या उपचारपध्दतीचाच (Clinical Protocol) रुग्णालयाने वापर करायचा आहे. ही बाब निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबतचे दरपत्रकही शासनाने रुग्णालयाकडे दिले आहे. त्यामुळे रुग्णालये अवाजवी बीले देवू शकत नाहीत. मात्र जर अशी अवाजवी बीले घेतल्याचे लक्षात येत असेल तर जिल्हा तक्रार निवारण केंद्रात तक्रार करावी. या रुग्णालयाचे कोविड ऑडिट होणार आहे. त्यावेळी अधिक रक्कम घेतल्याचे आढळून आल्यास ती रक्कम रुग्णालयाकडून वसुल करुन थेट रुग्णाला दिली जाईल.
(रत्नागिरी जिल्हा तक्रार निवारण केंद्र, दूरध्वनी क्र. 02352-222233)
(जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष, दूरध्वनी क्र. 02352-226248)
ग्राम कृती दले सक्रिय करणारच
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्राम कृती दलांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. यावेळी कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याने ग्राम कृती दले सक्रिय होणे आवश्यक आहे. आज जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ग्राम कृती दले सक्षमपणे उभी आहेत. मात्र काही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी अजुनही ग्राम कृती दले सक्रीय केलेली नाहीत. जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत याविषयावर सातत्याने चर्चा सुरु आहे. पुढील काही दिवसात ग्राम कृती दले सक्रीय होतील.
औद्योगिक क्षेत्राला अखेरचा इशारा
जिल्ह्यातील फिनोलेक्स, घरडा, विनीती ऑर्गनिक्स, सुप्रिया केमिकल्स अशा काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केल्या. काहींनी कंपनीच्या परिसरात कर्मचाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर उभारली. मात्र आजही औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी आपल्या कंपनीत तातडीने कोरोना तपासणी केंद्र व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर उभारावीत असे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन झाले नाही तर या कंपन्या लॉकडाऊन करण्यात येतील. असा अखेरचा इशारा दिल्याचे लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संबधित बातम्या वाचण्यासाठी खालील हेडलाईन्सवर क्लिक करा.
ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे
जिल्हाबाहेर प्रवासासाठी ई पास आवश्यक
( Speed of corona wave is increasing day to day, Today available Health facility for corona patients are Cut to Cut. We are increasing capacity of Oxygen Bed, Ventilator Bed, Covid Care Center. But The public also needs to realize this fact. They need to be vaccinated on their own, Adhere to restrictions, and if any one is symptomatic, early corona test is important Said Honorable Ratnagiri District Collector Laxminarayan Mishra in Online Video Conference with Press Reporters )