भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रकाश रहाटेंचे निधन
गुहागर, ता. 19 : शहरातील इलेक्ट्रीकल व्यावसायिक, गुहागर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष, जीवन शिक्षण शाळा क्रं १ व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश रहाटे यांचे रविवारी रात्री निधन झाले. अचानक तब्येत ढासळल्याने त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. 41 वर्षीय प्रकाशच्या निधनाने गुहागर शहरावर शोककळा पसरली आहे. प्रकाशच्या पश्चात त्याची पत्नी आणि इ. 9 वीत शिकणारा मुलगा व 5 वीत शिकणारी मुलगी आहे.
Prakash Rahate (Electrical Businessman, Nagarsevak, BJP Guhagar Shahar President, Vice President of School Management Committee) Passes Away,
शहरातील तेलीवाडी येथे रहाणारे प्रकाश रहाटे यांचे गुहागर बसस्थानकाशेजारी पांचाली इलेक्ट्रिक्लस् नावाचे दुकान होते. केवळ स्वत:च्या दुकानाचा व्याप न वाढवता प्रकाश रहाटे यांनी अनेक तरुणांना या व्यवसायत येण्यासाठी प्रोत्साहन दिले. पांचाली इलेक्ट्रीक्लस् हे ठिकाण म्हणजे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे बैठकीचे ठिकाण. महावितरणच्या वायरमनसोबत असलेल्या दोस्तीतून अनेकवेळा प्रकाश महावितरणला मदत करत असे. या दोस्तीमधुन अनेक ग्रामस्थांना वीज जोडणी घेण्यासाठी, वीजेचे खांब उभे करण्यासाठी, कृषी पंपासाठी प्रकाश मदत करत असे. व्यावसायिकतेपेक्षा सामाजिक कामाची आवड असल्याने अनेकांना इंदिरा आवास योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना लाभ प्रकाशने मिळवून दिला. शहरातील जीवन शिक्षण शाळा क्रं. १ च्या शाळा व्यवस्थापन समितीवर उपाध्यक्ष म्हणूनही प्रकाश रहाटे कार्यरत होते. शाळेच्या विकासासाठी कायम धडपणारे, शैक्षणिक उठावांर्गत सर्वांधिक देणग्या गोळा करणारे उपाध्यक्ष अशी त्यांची ओळख होती. फयान आणि निसर्ग वादळानंतर नुकसान झालेल्या अनेक ग्रामस्थांना व्यक्तिगतरित्या आर्थिक मदत केली. कोरोना संकटातही अनेकांना स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करुन शिधा दिला. प्रकाश रहाटे गेली 22 वर्ष एकनिष्ठेने भाजपचे काम करत आहे. गुहागर तालुका भाजपचे पदाधिकारी, शहर कार्यकारीणीचे पदाधिकारी असणारे प्रकाश रहाटे गेली दोन वर्ष भाजपचे गुहागर शहराचे अध्यक्ष होते. भाजपच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडतानाच ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाच वर्ष त्यांनी काम पाहिले. 2019 मध्ये भाजपचे त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपंचायतीत पाठवले.
कार्यकर्ता कसा असावा याचा एक अज्ञात किस्सा
भाजपचे माजी आमदार व सध्याचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. विनय नातू आणि प्रकाश रहाटे यांचे सुर कधीच जमले नाहीत. डॉ. नातूंसोबत त्यांचे व्यक्तिगत संबंधही उत्तम होते. तरीही एखाद्यासोबत गणित जमत नाही. तसे प्रकाशचे गणित नातूंबरोबर जमत नसे. तरीही आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रकाश रहाटे यांनी नातूंच्या नेतृत्त्वाबाबत जाहीरपणे वा खासगीतही वाच्यताही केली नाही. डॉ. नातूंच्या गुहागर दौऱ्यात प्रकाश रहाटे कायम सोबत असायचे. किंवा त्यांनी दिलेले कामही प्रकाश मार्गी लावायचा. पण नातुसाहेब सांगतील त्यापेक्षा वेगळ्या मार्गाने चालायला त्याला आवडायचे. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हा वसा त्याने सोडला नाही.
प्रतिक्रिया
एखादे काम समोर आले की ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारा एक चांगला कार्यकर्ता भाजपने गमावला आहे.
-डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी व माजी आमदार
तरुण उमदं, समाजाच्या उपयोगी विविध उपक्रमांसाठी धडपणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेलयं. तरुण असुनही अनेक वर्ष राजकीय आणि सामाजिक कामात असल्याने गुहागर नगरपंचायतीच्या विकास कामात त्यांचा मोठा सहभाग होता. प्रकाशच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. गुहागर नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी आणि शहरवासीय रहाटे कुटुंबावर झालेल्या आघातामध्ये, दु:खामध्ये सहभागी आहोत.
– राजेश बेंडल, नगराध्यक्ष, गुहागर नगरपंचायत
राजेंद्र आरेकरांचा परिवार आणि प्रकाशचे वेगळेच नाते आहे. त्यामुळे प्रकाशच्या निधनाचा मोठा धक्का गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांना बसला आहे. संपर्क साधल्यावर सुरुवातीचे काही क्षण ते बोलुच शकले नाहीत. प्रकाशला अहंकार नव्हता. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही त्यांची मनोवृत्ती लहानपणापासूनच होती. राजकीय प्रवासासाठी त्याच्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. स्वत:च्या जिद्दीतून, मेहनतीतून त्यांने त्यांची ओळख बनवली आहे. अवघ्या 41 व्या वर्षी अचानकपणे आपल्या सर्वांमधून निघून जाण्याने गुहागर शहरावर मोठा आघात झाला आहे.
– राजेंद्र आरेकर
शहरातील परचुरे कॉम्पलेक्सच्या मागून तेलीवाडी मार्गे बौद्धवाडी अशा शेतातून रस्ता करण्यासाठी प्रकाश रहाटे धडपडत होते. हा रस्ता झाला तर बौध्दवाडी परिसराचा विकास होईल. अनेकजण जमीनी घेवून घरे बांधतील. त्याठिकाणी नळपाणी योजना आणि वीजही पोचली पाहिजे. यासाठी प्रकाश आग्रही होता. त्यासाठी संबंधित मार्गावरील सर्व शेतकऱ्यांबरोबर प्रकाश रहाटे यांची बोलणी सुरु होती. प्रस्ताव मंजुर होण्यासाठी प्रकाश धडपडला. आता हे काम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र नगरसेवक म्हणून त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण झालेले पहाण्यासाठी तो आमच्यात नाही. याचे दु:ख आहे.
– उमेश भोसले गुहागर नगरपंचायत भाजप गटनेते
सर्वसामान्यांमध्ये वावरणारा, दुसऱ्यांच दु:ख समजून घेणारा, पदे असूनही गर्व नसलेले एक चांगला कार्यकर्ता गुहागर शहराने गमावला आहे. तेली वाडी आणि शिवाजी चौक परिसरातील सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने तो सहभागी होत असे.
– विमा प्रतिनिधी संतोष वरंडे