पालकमंत्री परब; पोमेंडीमध्ये भक्तनिवास, व्यायामशाळा, ग्रंथालय व रस्त्याचे भूमिपूजन
गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्याचा निधी कोणालाही पळवून देणार नाही. तो याच जिल्ह्यात खर्ची पडेल. असे आश्र्वासन राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले. ते पोमेंडी येथील सोमेश्र्वर मंदिरात भक्तनिवासाच्या भुमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
ठाण्यातील शिवसेना खासदार राजन विचारे यांचे मुळ गाव गुहागर तालुक्यातील पोमेंडी. दरवर्षी प्रत्येक सणाला आवर्जुन राजन विचारे आणि त्यांचे कुटुंबिय पोमेंडीत येथे. पोमेंडी गावाच्या विकासामध्येही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. 2006 मध्ये पोमेंडीतील सोमेश्र्वर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. आता या मंदिराजवळ भक्तनिवास, व्यायामशाळा आणि ग्रंथालय बांधण्याची ग्रामस्थांची इच्छा आहे. तसेच गावातील एका रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. खासदार राजन विचारे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून या कामांसाठी राज्य शासनाने निधी देण्याची मागणी केली. राज्य शासनाने खासदार राजन विचारे यांच्या मागण्यांना मंजुरी दिली. राज्याच्या यात्रा स्थळ विकास कार्यक्रमातून भक्तनिवास, व्यायामशाळा आणि ग्रंथालयासाठी 19 लाख, 90 हजार, 413 रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर जनसुविधा योजनेतून पोमेंडी गावातील नंदु कदम घर ते पायरी थांबा या रस्त्यासाठी 19 लाख, 98 हजार 306 रुपयांचा निधी मंजुर झाला.
या कामांच्या भूमिपुजनप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर, पोलीस दलाच्या कोकण परिक्षेत्राचे उप महासंचालक संजय मोहिते, रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, माणूस कितीही मोठा झाला तरी आपले मुळ गाव कधी विसरु शकत नाही. राजन विचारे यांनी ठाण्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. नगरसेवक ते खासदार असा त्याचा राजकीय प्रवास आहे. मात्र या प्रवासात ते कधीही गाव विसरले नाहीत. माझ्याकडे मंत्रीपद असताना देखील पोमेंडी गावातील काही विकासकामांना मी निधी दिला आहे. श्री सोमेश्र्वराचे आशिर्वाद आणि गावकऱ्यांचे प्रेम त्यांना कायम मिळत राहो.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, खासदार राजन विचारे आणि पालकमंत्र्यांची मैत्री असल्याने पोमेंडीतील विकासकामांसाठी 40 लाखांचा निधी मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आणि माझ्या मतदारसंघातही अशी अनेक मंदिरे आहेत. त्यांच्या विकासासाठीही पालकमंत्र्यांनी निधी द्यावा. सोमेश्र्वराचे आशिर्वाद ज्याप्रमाणे सर्वांना मिळत आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध मंदिराचे आणि ग्रामस्थांचेही आशिर्वाद पालकमंत्र्यांना मिळतील.
सहकारी मंत्री उदय सामंत याचा मुद्दा उचलूनच पालकमंत्री अनिल परब यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. ते म्हणाले की, रत्नागिरीचा पालकमंत्री झाल्यानंतरचे 10 महिने कोरोना संकटात गेले. त्यामुळे या जिल्ह्यातील विकास कामांना मंजुरी देण्यास उशीर झाला. मात्र आता जिल्ह्याच्या वाट्याला येणारा पैसा जिल्ह्यालाच मिळेल. कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला हा निधी मिळेल. हा जिल्हा म्हणजे देवांची भूमी आहे. येथील देवस्थानांचा विकास व्हावा ही सर्वांचीच इच्छा असते. ठाण्यात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते खासदार असा प्रवास करणाऱ्या राजन विचारे देखील आपल्या गावाच्या विकासाचा विचार करतात. त्यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिलेला असल्याने त्यांनी केलेल्या मागण्यांना लगेच मंजुरी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार राजन विचारे यांनी पोमेंडी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. समारंभानंतर धार्मिक विधी करुन अनिल परब यांनी भूमिपुजन केले. खासदार राजन विचारे, मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव आदी मान्यवरांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर मान्यवरांनी पिकावाने माती खणून भक्तनिवासच्या बांधकामाचे उद्घाटन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री व अधिकाऱ्यांचे सहाय्यक सचिव, पोमेंडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.