गुहागर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन
गुहागर, ता. 13 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (DRDO) गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (Oxygen Generation Plant) उभा रहात आहे. देशात अशा पध्दतीने उभ्या रहात असलेल्या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण (inugration) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Nerendra Modi) यांच्या उपस्थित हस्ते ऑनलाईन (Online Programme) पध्दतीने होणार आहे. गुहागरमधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गुहागर ग्रामिण रूग्णालयाबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, खेड, रत्नागिरी या ठिकाणीही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि एचएलएल इन्फ्राच्या (HLL INFRA) वतीने करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत संशोधन आणि विकास संस्था (DRDO) काम करते. या संस्थेने वैद्यकिय क्षेत्रासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती करणारा छोटा, कमी खर्चात उभा रहाणारा, स्वदेशी तंत्रज्ञान असलेला हा प्रकल्प संशोधनातून तयार केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. देशातील ५८० ठिकाणी असे वैद्यकिय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्थांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील २८ ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असणारे बांधकाम आणि इलेक्ट्रीफिकेशन करुन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेतली आहे.
गुहागरमधील काम प्रगतीपथावर
गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालयाच्या जून्या इमारतीचे ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. मुंबई – गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. त्याप्रमाणे प्रकल्पाकरीताचे बंदिस्त शेड उभारणी करण्यात आली आहे. तर ऑक्सिजन प्रकल्प बसविण्याचे काम भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत बैद्यकिय क्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणी करणारी एचएलएल इन्फ्राटेक सर्व्हिसेस ही संस्था करत आहे. या प्रकल्पासाठी यंत्रसामग्री आली असून त्याचे जोडकाम अजूनही सुरू झालेली नाही. ऑक्सिजन प्रकल्पाची सर्व यंत्रसामग्री रशीयातून आणली असुन हा प्रकल्प वीजेवर चालणारा आहे. मात्र, याठिकाणी अजून वीज मीटर बसविण्यात आलेला नाही. वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्यासाठी जनरेटरवर चालवीला जाणार आहे. पीएसए पद्धतीच्या या प्रकल्पात हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन शुद्ध ऑक्सिजन तयार केले जाणार आहे. यातून प्रति मिनिट १०० लिटर ऑक्सिजन तयार होईल, जो एकाचवेळी प्रति मिनिट ५ ते ६ लिटर क्षमतेने १० ते १५ रुग्णांना आपण देवू शकतो. गुहागर ग्रामिण रूग्णालयामध्ये कोविडकरीता २५ बेडची व्यवस्था असून १५ ऑक्सिजन बेड आहेत. यामुळे गुहागरकरीता हा प्रकल्प कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी एकप्रकारे वरदान ठरणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (DRDO) देशात उभ्या रहाणाऱ्या 580 प्रकल्पांसाठी पंतप्रधान फंडामधुन (PM Cares Fund) निधी देण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी करतील असे वृत्त आहे.