तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी
गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली. येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची अंडी संरक्षित केली आहे. यावर्षी मोठ्या संख्येने अंडी मिळाल्याने येथील ग्रामस्थ कासव महोत्सव करण्याच्या तयारीत आहेत.
जयगड खाडी लगत वसलेल्या तवसाळ गावाच्या समोर जयगडचे बंदर आहे. या बंदर परिसरात कान्होजी आंग्रे पोर्ट, चौगुले उद्योग समुह, जेएसडब्ल्यू या कंपन्या आहेत. त्यांच्यामुळे या बंदराचा झपाट्याने विकास होत आहे. येथील जलवाहतुकही वाढली आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग कार्पोरेशनने जयगड तवसाळ फेरीबोट सेवाही सुरु केली आहे. समुद्रातील या वहातुकीमुळे गेल्या 15 वर्षात तवसाळच्या किनाऱ्यावर कासवे येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले होते. फेरीबोटीमुळे पर्यटकांचे प्रमाण वाढु लागल्यावर येथील पर्यटनप्रेमी नीलेश सुर्वे यांनी तवसाळमध्ये अँगलिंग फिशिंगचा छंद असणाऱ्या पर्यटकांची रहाण्याची व्यवस्था सुरु केली. त्यामुळे अँगलिंग फिशिंगसाठी तवसाळ हे गुहागरमधील हॉट डेस्टिनेशन बनले.
याच गावातील महेश सुर्वे त्याच्या मित्रांसोबत कासव संवर्धनाचे काम करत होता. एखादं घरट सापडलं तर ते संरक्षित करुन वन विभागाला त्याची माहिती देत असे. त्यामुळे वन खात्यांच्या संपर्कात महेश सुर्वे होता. यावर्षी एकाच दिवशी तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची तब्बल 7 घरटी सापडली. ही माहिती महेश सुर्वे यांनी वनखात्याला दिली. या माहितीची दखल घेत वनपाल शेटे, वनरक्षक मांडवकर यांनी तवसाळमध्ये कासव संवर्धन केंद्र सुरु केले. या केंद्रात एकाच दिवशी सापडलेल्या 7 घरट्यांमधील अंड्यांसह अन्यवेळी सापडलेल्या 1 घरट्यातील अशी एकूण 872 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
एकाच दिवशी एकाच समुद्रकिनाऱ्यावर 7 घरटी सापडणे ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे तवसाळमधील पर्यटनप्रेमी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक वर्षांनंतर एकाच दिवशी शेकडो कासवांची पिल्ले सोडण्याची संधी तवसाळ ग्रामस्थांना मिळाली आहे. त्यामुळे छोटेखानी कासव महोत्सव करण्याचा विचार तवसाळचे ग्रामस्थ करत आहेत.
तवसाळमध्ये एकाच दिवशी 7 घरट्यांमधून अंडी मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. यानिमित्ताने वनविभागाच्या समन्वय व सहकार्यातून तवसाळमध्ये कासव महोत्सव झाला तर तवसाळमधील पर्यटन व्यवसायात निश्चितच वाढ होईल. रोजगार मिळेल. असे मत तवसाळ कांदळवन समितीचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी व्यक्त केले आहे.