आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले
गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ठेवता येणार नाही. असा नियम आहे. त्यामुळे आमदारांचे प्रयत्न यशस्वी होवून आणि जिल्हाधिकाऱ्यांचा होकार असूनही कोविड केअर सेंटरची निर्मिती मात्र नियमात अडकली आहे.
गुहागरच्या आरोग्य विभागाला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. ही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी पूर्ण केली. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याचे दिवशी गुहागरमध्ये कोविड केअर सेंटर व्हावे, तेथे ऑक्सिजनची व्यवस्था ही. अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा आमदार भास्कर जाधव यांनी तत्काळ पाठपुरावा सुरु केला. ग्रामीण रुग्णालयाची पहाणी केली. रुग्णालयाची रचना लक्षात घेता एका भागात कोविड रुग्णांना ठेवता येऊ शकते अशी चर्चाही रुग्णालयातच झाली. तेथूनच आमदार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन कोविड केअर सेंटरला परवानगी विषयी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही कोविड केअर सेंटरला हिरवा कंदिल दाखवला. परंतू ग्रामीण रुग्णालयात अन्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरावे. कोरोना संदर्भातील कोणतीही कार्यवाही तेथे होवू नये. असा नियम असल्याचे समोर आले. त्यामुळे गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरचा प्रस्ताव बारगळला आहे.
————————————————————————————————————————
ओपीडीत रुग्ण का नाहीत – आमदार जाधवांचा सवाल
ग्रामीण रुग्णालय हे गोरगरीब जनतेसाठी हक्काचे रुग्णालय आहे. गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला सुसज्ज इमारत आहे. वैद्यकिय अधिकारी, नर्स अन्य स्टाफ इथे आहे. प्रयोगशाळा आहे. आता रुग्णवाहिकाही उपलब्ध आहे. मग रुग्णालयात रुग्ण का येत नाहीत. केवळ 40 ओपिडी असणे हे योग्य नाही. इतक्या सुविधा असुनही तालुक्यातील गोर गरीब जनता येथे उपचारासाठी येत नसेल तर सेवेत कोणती कमी आहे याचा शोध येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे.