परिचारीकांचा अनुभव ; बालिका जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात
गुहागर, ता. 15 : नवजात बाळाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी नेताना परिचारिकांच्या मनात भावनांचा हलकल्लोळ सुरु होता. मातृत्वाच्या स्पर्शासाठी आसुलेल्या बाळाच्या रडण्याने मन तीळ तीळ तुटतं होतं. जन्मल्यानंतर भोगाव्या लागलेल्या यातनांमुळे बाळाला होणाऱ्या वेदना समजत होत्या पण सहन करता येत नव्हत्या. अशा दोलायमान भावनिक अवस्थेमुळे गुहागर ते रत्नागिरी या अवघ्या 150 कि.मी.चा प्रवासात प्रकृती बिघडली. जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात बाळाला देताना मन घट्ट करुन कर्तव्य निभावले. अशा शब्दांत परिचारिका सविता गोडे आणि सह परिचारिका सोनल पावसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


14 ऑगस्टला रात्री 9 वा. धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट जेटीजवळ नवजात स्त्री अर्भक सापडले. खाडीच्या किनारी खाजणात टाकून दिलेल्या या बाळाला स्थानिक तरुणांनी बाहेर काढले. तेथील महिलांनी दूध पाजले. रात्री 9.30 च्या सुमारास पोलीस पोचले. प्राथमिक चौकशी व तपास केल्यावर पोलीसांनी नवजात बाळ ताब्यात घेतले आणि ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे ताब्यात दिले.
ग्रामीण रुग्णालयात बाळाला उबदार पाण्याने आंघोळ घालण्यात आली. आईची उब मिळावी म्हणून एक उबदार पेटीत ठेवले. बाळाच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती म्हणून बालरोग तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांनी ऑक्सिजन दिला. सलाईनमधुन औषधे दिली. ग्रामीण रुग्णालय गुहागरमध्ये कोविड रुग्ण असल्याने बाळाची प्रकृती स्थीर झाल्यावर रात्री 1 वाजता नवजात बाळाला रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. परिचारिका सविता गोडे आणि सह परिचारिका सोनल पावसकर, महिला पोलीस नाईक ईश्वरी सावंत या तीन महिला कर्मचारी बाळाला सोबत घेवून रुग्णवाहिकेने रत्नागिरीला निघाल्या.
या प्रवासाचे वर्णन करताना सहपरिचारिका सोनल पावसकर म्हणाल्या की, आजची परिस्थिती अत्यंत विचित्र होती. काही तासांपूर्वी जन्माला आलेले बाळ आईविना आहे ही कल्पनाच सहन होत नव्हती. एक आई नऊ महिने पोटात वाढवलेलं बाळ अस कसं टाकून देऊ शकते. या विचारांनी काहुर माजले होते. काही महिन्यांपूर्वीच सेवत दाखल झालेली मी आणि अनेक वर्ष परिचारीका म्हणून सेवा बजावणाऱ्या सविता गोरे, दोघांचीही मानसिक अवस्था सारखीच होती. कोणतेही विघ्न येऊ न देता रत्नागिरीपर्यंतचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. असं आम्ही दोघी एकमेकींना बजावत होतो. आईच्या स्पर्शासाठी आसुलेल्या बाळाकडे पाहिल्यावर अगितकतेपलीकडे आम्ही काहीच करु शकतं नव्हतो. अधुनमधून बाळ रडत होते. त्याला शांत करताना आमच्या जीवाची तगमग होत असे. या दडपणामुळे अखेर आमची प्रकृती बिघडली. गाडी लागल्याचे निमित्त झाले. उलट्या होवू लागल्या. त्यातच एका क्षणाला बाळाचा श्वास थांबत असल्याचे जाणवले. तशाही परिस्थितीत सविता गोडे यांनी प्रसंगावधान राखले. थोडेसे उपचार केल्यावर बाळ नियमितपणे श्र्वास घेऊ लागले. हा प्रवास कधी संपतो असे झाले होते. अखेर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोचली. बाळ ताब्यात देण्याची वेळ आली. तेव्हा वात्सल्याची भावना इतकी उचंबळून आली की बाळाला देताना आमचे हातही जड झाले. आमचे कर्तव्य आम्ही निभावले असले तरी मन शांत होत नव्हते.
14 ऑगस्टला रात्री 4.15 वाजता नवजात अर्भकाला जिल्हा रुग्णालयाच्या स्वाधिन करुन दोन्ही परिचारिका रुग्णवाहिकेने गुहागरला आल्या. पोलीस नाईक ईश्वरी सावंत पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरीतच थांबल्या. रत्नागिरी येथील बाल कल्याण कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या बाळाला चिपळूणमधील संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम ईश्वरी सावंत करत आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम करत आहेत.
संबंधित बातम्या : धोपावे फेरीबोट जेटीजवळ सापडले नवजात अर्भक