ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात होणार इमारत, श्रीफळ वाढवून शिक्कामोर्तब
गुहागर, ता. 3 : गुहागर शहरातील नव्या शवविच्छेदन गृहाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, नगराध्यक्ष राजेश बेंडल आणि ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य समिती सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील जागा निश्चित केली. श्रीफळ वाढवले. आता निश्चित केलेल्या जागेत शवविच्छेदन गृहाच्या बांधकामाला सुरवात होणार आहे.
गुहागरच्या स्मशानभुमीशेजारी असलेले शवविच्छेदन गृह गेली अनेक वर्ष नादुरुस्त आहे. खिडक्यांना काचा नाहीत. गळका स्लॅब झाकण्यासाठी घातलेले पत्रे देखील फुटले, उडालेले. शवविच्छेदन गृहात पाण्याची व्यवस्था नाही. अशा दुरावस्थेतील शवविच्छेदन गृहाचा वापर आजपर्यंत आरोग्य विभागाला करावा लागत होता. अनेक वेळा मागणी करुनही त्या शवविच्छेदन गृहाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नव्हता. शिवाय ग्रामीण रुग्णालयापासून शवविच्छेदन गृह दुर असल्यामुळे त्याला पर्यायी जागेचा शोध सुरु होता.
शवविच्छेदन गृह ही आवश्यक बाब असली तरी येथे चालणाऱ्या प्रक्रियेबद्दल एक अनामिक भिती समाजात आहे. अनेकवेळा आकस्मिक, अपघाती मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडेपर्यंत तो मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवला जातो. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांचा बांध फुटतो. त्यामुळे वस्तीपासून अलग जागा मिळणे. तेथे वीज, पाणी या व्यवस्थांची पूर्तता करणे, रुग्णवाहिका जाण्याएवढा रस्ता उपलब्ध असणे. या सर्व बाबी पडताळून जागा देणे जिकीरीचे बनले होते.
शवविच्छेदन गृहाचे काम लवकर व्हावे यासाठी गुहागरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन बेंडल यांनी जनजागृती केली. गुहागर शहरासह, आसपासच्या गावातील ग्रामस्थांच्या सह्या गोळा केल्या. आणि 500 सह्यांचे निवेदन आरोग्य खात्याकडे दिले होते. गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल गेले काही महिने शवविच्छेदन गृहासाठी शहरातील जागांचा पर्याय शोधत होते. गुहागर शहर भारतीय जनता युवा मोर्चाने देखील जिल्हा शल्य चिकित्सकांना शवविच्छेदनाचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. सर्वांच्या प्रयत्नांना पाच दिवसांपूर्वी यश आले.
गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य समितीच्या बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले गुहागरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच जागा निश्चित करण्यासंदर्भात आग्रह धरला. उपस्थित सर्वच सन्माननीय सदस्यांनी ही मागणी मान्य करत ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील जागा निश्चित केली. या जागेशेजारी एक घर आहे. तेथील कुटुंबाजवळ बोलून नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी त्या कुटुंबाची परवानगी घेतली. आरोग्य समितीच्या सभेत ठराव मंजूर करण्यात आला. लगेचच उपस्थित सर्वांनी निश्चित केलेल्या जागी डॉ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जागेवर शिक्कामोर्तब केले.
नव्या शवविच्छेदन गृहाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासाठी आवश्यक असणारा सुमारे 8 लाख रुपयांचा निधी ग्रामीण रुग्णालयाकडे जमा आहे. त्यामुळे तातडीने या बांधकामालाही सुरवात होणार आहे. नव्या शवविच्छेदन गृहात पाणी, वीज या आवश्यक सुविधांबरोबरच मृतदेह ठेवण्यासाठी दोन शितपेट्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.