मालवहातुकीद्वारे आंबा पोचविण्यासाठी एस.टी. सज्ज
गुहागर : एस.टी. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कुठेही आंबा (Ratnagiri Hapus) पोचविला जाणार आहे. परिणामी राज्यातील जनतेपर्यंत थेट बागेतून स्वस्त दरात, सहजतेने रत्नागिरी हापूस उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुण्याबरोबर राज्यातील अन्य मोठ्या शहरात (Mumbai, Pune, Nagpur, Aurangabad, etc) नवी बाजारपेठ मिळवण्याची संधी आंबा व्यावसायिकांना (Mango Grower) आयती चालून आली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी विभागीय कार्यालयातील 10 अधिकाऱ्यांसह 9 आगारातील 20 कर्मचारी आंबा बागायतदारांच्या भेटी घेत आहेत.
कोरोनाच्या संकटानंतर एस.टी. महामंडळ (MSRTC) फायद्यात येण्यासाठी एस.टी.ने माल वहातूक सुरु केली. आज किराणा माल, इमारती बांधकामासाठी आवश्यक साहित्य, औद्योगिक माल आदी विविध प्रकारचा मालाची वहातूक एस.टी. करत आहे. येत्या आंबा हंगामात रत्नागिरी विभागातून आंबा वहातूक (Transport) करण्याचे नियोजन एस.टी. महामंडळ करत आहेत. आंबा बागायदार आणि खरेदीदार या दोघांचाही फायदा विचार या योजनेत आहे. थेट बागेतून किंवा पॅकिंग हाऊसमधुन आंब्याच्या पेट्या उचलणे, एस.टी.ने निश्चित केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे, एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल उतरविणे. शहरातील विविध भागात ट्रक जाऊ शकेल अशा ठिकाणी नगावर माल उतरविणे. असे पर्याय एस.टी.ने खुले ठेवले आहेत.
५ डझनाच्या लाकडी खोक्यापासून 2 डझनाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यापर्यंत सर्व पॅकिंगमधील आंबा एस.टी. स्विकारणार आहे. पुठ्ठ्याचा खोका फाटू नये. तळातील आंबा पेटीवर दाब पडू नये. वहातुकी दरम्यान ट्रकमधील आंबा खोके सरकु नयेत. हवा खेळती रहावी. यासाठी एस.टी. आपल्या ट्रकमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदलही करणार आहे.
राज्यातील एखाद्या शहरातून एस.टी.कडे आंब्याची मागणी केली गेली तर त्या ग्राहकाला (Customer) थेट बागायतदाराशी जोडून देण्याचे कामही एस.टी. करणार आहे. या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली (Mango Market Open) होणार आहे. तसेच राज्यातील जनतेला थेट कोकणाच्या बागेतील उपलब्ध होणार आहे.
आज कोकणातील अनेक आंबा बागायतदार सामाजिक माध्यमांचा वापर करुन आपल्या बागेतील आंबा उत्पादनाची जाहिरात करतात. त्यातून आलेल्या मागणीनुसार आंबा पाठविण्यासाठी कुरिअर सेवेचे वापर करतात. मात्र या सेवेसाठी काही वेळा आंब्याच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. आता एस.टी.ची माल वहातूक सेवा सुरु झाल्यामुळे एखाद्या शहरातील विविध ठिकाणी 30, 40 आंबा पेट्या पोचविणे आंबा बागायतदारांना सहज शक्य होणार आहे. फक्त अशा शहरात वितरणाची व्यवस्था बागायतदारांना उभी करावी लागेल. मुंबई, पुणे या शहरात अशी वितरणाची व्यवस्था अनेक आंबा बागायतदारांनी उभी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या बागायतदारांसह छोट्या बागायतदारांनाही किफायतशीर दरात, राज्यात कुठेही आंबा पाठविण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत. 2020 च्या हंगामातील अखेरच्या दिवसात एस.टी.ला हा व्यवसाय करण्याची संधी मिळाली. मात्र त्याचाही फायदा आंबा बागायतदारांना झाला. सुमारे 3500 लाकडी खोक्यांची वहातूक आम्ही केली. मुंबई उपनगरे, पुणे, वाशी मार्केटसह अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापर आदी जिल्ह्यात एस.टी.ने आंबा पोचला. यावर्षी सुरवातीपासूनच आम्ही नियोजन करत आहोत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंबा बागायतदारांच्या भेटी आम्ही घेतल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघासोबत एक सभाही घेत आहोत. या संवादातून आंबा बागायदारांना कशी सेवा अपेक्षित आहे. आम्ही कशाप्रकारे वहातूक करु शकतो. याचे अनेक मुद्दे समोर येत आहेत. या समन्वयातून राज्यातील विविध भागात आंबा पोचविण्याचे आमचे लक्ष्य साध्य होईल. तसेच आंबा बागायदारांच्या व्यवसायातही वाढ होईल.
अनिल म्हेतर, विभागीय वहातूक अधिकारी, रत्नागिरी