गजानन ऊर्फ नाना महाडिक व पत्नी सुनंदा यांचे निधन
गुहागर, ता. 01 : शहरातील शिवाजी चौकात रहाणारे, सन्मित्र मंडळ व तेली युवक संघाचे आधारस्तंभ आणि तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजानन तथा नाना महाडिक यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. तर त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा महाडिक यांचे 1 मे रोजी कोरोनाने खोपोली येथे निधन झाले. अवघ्या 24 तासांच्या आत पती पत्नीचे निधन झाले त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. अनेक कारागीर घडविणारा, हरन्नुरी बांधकाम व्यावसायिक अशी ओळख असणाऱ्या नानांच्या निधनाने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.
मनमिळाऊ आणि विनोदी स्वभाव असलेले गजानन महाडिक यांना गुहागर तालुका नाना म्हणून ओळख होता. ते घरबांधणी व्यवसायातील जुनेजाणते कारागीर होते. कौलारु आणि त्यानंतर स्लॅबची घरे उभारण्याची कामे नाना अनेक वर्षे करत आहेत. या व्यवसायातून त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला काम दिले. त्यांच्या मुशीत घडलेला प्रत्येक कारागीराने आज स्वतंत्रपणे आपला बांधकाम व्यवसाय सुरू केले आहे. शिमगोत्सवात होणाऱ्या तमाशा कार्यक्रमातील नाना हे उत्तम कलाकार होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी अनेक लोकाभिमुख कार्यात सहभाग घेतला.
त्याचा मुलगा उदय हा कामानिमित्त रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे रहात होता. त्यामुळे अनेकवेळा नाना व त्यांची पत्नी सौ. सुनंदा खोपोली येथे रहात असत. कोरोनाच्या साथीतही ते खोपोलीतच वास्तव्याला होते. तेथे नाना व सुनंदा या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. 30 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास नाना यांची ऑक्सीजन पातळी कमी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी गुहागर शहरात पोचताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच शनिवारी पहाटे 5. 50 वाजता त्यांची पत्नी सुनंदा महाडिक यांचेही निधन झाले. या दोघांच्या निधनाने महाडिक परिवारावर मोठा आघात झाला आहे.