आयुष्य किती खडतरं असत आणि एखाद्याला किती भोग भोगावे लागतात, चटके सहन करावे लागतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बलंग गुरुजींचं बालपण आणि तरुणपण. हे सारं सोसुनही, न हरता, न रडता, न खचता बलंग गुरूजी ताकदीने उभे राहीले. नोकरीने आर्थिक स्थिरता दिल्यावर त्यांच्यातील नाविन्याचा शोध घेणारा शिक्षक, संघटक, अन्यायाशी झगडणारा सैनिक जागा झाला.
नामदेव वामन बलंग (बलंग गुरूजी) यांचा जन्म 19 ऑगस्ट 1958 साली झाला. बालपण अत्यंत कठीण परिस्थितीतून गेले. 2 वर्षांचे असताना वडील गेले. आई जन्मत: मुकी व बहिरी, मोठा भाऊ कृष्णा 5 वर्षांचा होता. त्यामुळे बलंग गुरुजींना शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्या शिक्षणासाठी आणि घरी देण्यासाठी काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यांनी खानावळीत वाढप्याचे काम केले. आवळा सुपारी तयार करुन विकण्याचे काम केले. अशा पध्दतीने कष्ट करत डी.एड्. करताना रजेच्या काळात 1979 साली सातारा येथील न्यू इंग्लिश स्कुल सातारा येथे रूजू झाले. नोकरी करत असतानाचा ग्रंथपालाचा कोर्स पूर्ण केला.
1983 मध्ये जि. प. रत्नागिरी येथे एका देवमाणसाच्या मार्गदर्शनाने शिक्षक म्हणून सरकारी नोकरी मिळाली. येथूनच त्यांच्या प्रगतीला सुरूवात झाली. अत्यंत उत्साही स्वभाव, नाविन्याचा ध्यास असलेल्या बलंग गुरुजींना दुपटे गुरूजी, भोळे गुरूजी, कटनाक गुरूजी यांच्यासारखे सहकारी लाभले. त्यातून त्यांची कारकिर्द घडत गेली. धडाधडीने त्यांनी शाळेत नवनवीन उपक्रम राबवले. ज्यामध्ये स्नेहसंम्मेलन, गणवेष, स्कॉलरशिप मार्गदर्शन असे विविध उपक्रम होते. संघटनेमध्ये क्रियाशील बनले आणि विविध आघाड्यांवर शिक्षकांच्या प्रश्र्नांना न्याय देण्यासाठी झगडणाऱ्या पदाधिकाऱ्यांमधील एक व्यक्ती बनले. प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक, गटसंमेलन शिक्षक सभा या ठिकाणी त्यांनी स्वत:ची एक वेगळी छाप उमटवली.
कै.बलंग गुरूजी यांचे पश्चात त्यांची सुविद्य पत्नी, मोठे भाऊ, वहिनी, शिक्षिका असलेली कन्या, जावई, क्लाऊड इंजिनिअर झालेला मुलगा, सून असा परिवार आहे.
आठवण तर आहेच, व्यक्त करायला शब्द उमटत नाहीत
भावना व्यक्त करायला, आमच्यातून गेलाच नाही
जगण्याला बळ देणारे माझे बलंग गुरूजी
यशवंत माणके (गुरूजींचा विद्यार्थी, पेवे खरेकोंड)
नव्याने बदली होऊन आलेले नामदेव वामन बलंग गुरूजी आमच्या जि. प. रत्नागिरी मराठी शाळा पेवे खरेकोंडला लाभले. तेव्हा मी इयत्ता चौथीत होतो. पहीली ते चौथीला येईपर्यंत मोहिते गुरूजी आणि भोळे गुरूजी होते. सुरूवातीला जरी त्यांची भिती वाटत असली तरी एव्हाना आता आम्हाला त्यांची सवय झाली होती. पण जेव्हा बलंग गुरूजी आमचे वर्ग शिक्षक आहेत हे कळले तेव्हा मात्र अख्खा वर्ग चिंतेत पडला होता. स्वभावाने कसे असतील या विचाराने वर्गात शांतता पसरली.
एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. वर्गात येताच पुस्तकातले धडे बाजुला ठेऊन उठण्यापासून बसण्यापर्यंतचे शिस्तीचे सर्व धडे सुरू झाले. दगडांना आकार द्यायला सूरूवात झाली. दग़ड टाकीचे घाव तर आम्ही छडीचे मार सोसत होतो. मनात भिती कायम पण रोज एक नवीन शिकवण. आपल्या शाळेचा गणवेश असावा अशी त्यांच्या डोक्यात संकल्पना आली. एका महिन्यात बलंग गुरुजींनी ती प्रत्यक्षात राबवली सुद्धा. ज्यांची गणवेश घ्यायची ऐपत नव्हती त्यांना स्वखर्चाने गणवेश दिला. इतका दिलदार माणूस पण शिस्तीत तडजोड नाही. दिवसागणिक शाळा नवे रूप धारण करत होती. वर्गापासून ते आवारापर्यंत स्वत:ला स्वच्छ करून घेत होती. याला निमित्त होते बलंग गुरूजी.
त्याच वर्षी दसऱ्याला शाळेत स्नेहसंमेलन घेतल. तीन बालगीतांबरोबर “प्राणी स्वातंत्र्याचा विजय असो” या बालनाट्यात मला बलंग गुरूजीनी संधी दिली. इथेच माझ्या मनात कलेचे बिज रुजले. पूढे सातवी पर्यंत “निश्चयाचा महामेरु” आणि “बेपत्ता” ही दोन नाटक माझ्या वाट्याला आले. शाळा सातवीपर्यंत असल्याने आता निरोप घेण्याची वेळ आली. शाळा सोडताना जेवढं दु:ख होत होते तेवढच या महान गुरूला अंतरण्याच्या कल्पनेने अंत:करण जड झाले होते.
इथूनच खरी गुरू-शिष्याच्या प्रवासाला खरी सुरूवात झाली. प्रत्येक पावलावर गुरूजी माझ्याबरोबर होते, माझे पहीले नाटक “निर्दयी” च्या प्रचारासाठी त्यांनी खूप मदत केली. त्याच दरम्यान विश्वास बेलवलकर गुरूजींची अभिमानाने माझा विद्यार्थी म्हणून भेट घालून दिली. शिस्तीने कडक असणाऱ्या गुरूजींनी आणि बलंग बाईंनी माझ्या आयुष्याला वलयं दिली. हे मला कधीच विसरता येणार नाही.
गुरूपौर्णीमेला आवर्जून अगदी हक्काने, तेवढ्याच विश्वासाने फोनची वाट बघणारे माझे गुरूजी मात्र आमच्यात नाहीत ही खंत न भरून निघणारी आहे. पोरकेपणा काय असतो याची जाणीव होते आहे गुरूजी. एका बाजुला माझ्या शॉर्टफिल्मला तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचत असतानाच, तुमच्या जाण्याचा नमिताचा आलेला “बाबा गेले रे दादा” हा मेसेज माझ्यासाठी मोठा धक्का देऊन गेला. खूप बोलण्यासारखे आहे पण तुर्तास थांबतो. तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
बागकामात रमणारे बलंग गुरूजी
श्री अनिल केतकर साहेब, निवृत्त शाखा व्यवस्थापक
बलंग गुरूजींचा माझा परिचय सुमारे ३३ वषापूर्वी झाला. त्यावेळी आम्ही दोघेही नोकरीत नवीनच होतो. काही काळाने ते माझ्या शेजारीच रहायला आले. अत्यंत सरळ स्वभाव. पापभिरू वृत्ती. आपल्या नोकरीत, कामात सदैव कार्यरत, बागकाम, स्वच्छतेविषयी जागरूकता असे त्यांचे गुण होते. त्यांचेकडून मी आवळा सुपारी करायला शिकलो. त्यांना सतत काही ना काही करायची आवड होती. घराभोवती केलेली फुलझाडांची बाग हे त्याचे उत्तम उदाहरणं. त्याच आवडीखातर त्यांनी थोडी जमीन घेऊन तेथे फळझाडांची लागवड केली होती. तेथे ते रमत असत. त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासात सुख – दुःखात त्यांच्या सुविदय पत्नी निलांबरी या खंबीरपणे सोबत होत्या. त्यांचे अकाली जाणे हा मला मोठाच धक्का होता.
शिक्षक समितीची उभारणी करणारे बलंग गुरुजी
श्री. विश्र्वास बेलवलकर (माजी संचालक, प्राथमिक शिक्षक पतपेढी)
एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि शिक्षक म्हणून विदयार्थी परिवारात आदराचे स्थान निर्माण करणारे अत्यंत शांतताप्रिय परिजन म्हणजे कै. नामदेव वामन बलंग गुरुजी. गुहागर तालुक्यात शैक्षणिक कार्यात विषेश उल्लेखनीय काम गेले 35 वर्ष सतत करत रहाणारे आणि संघटनात्मक कार्यात शिक्षकांना वेगळी दिशा देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे बलंग गुरुजी. संघटनेमध्ये तत्त्वनिष्ठ कसे रहावे आणि योग्य दिशा कशी ठरवावी. याचे सुंदर मार्गदर्शक म्हणजे बलंग गुरूजी. नोकरी पेशाला सुरूवात केल्यापासून त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीमध्ये पदार्पण केले. संघटनात्मक असंख्य वादळे आली. परंतू शिक्षक समितीच्या ध्येय धोरणांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड हे समितीचे ब्रीदवाक्य. त्याच्याशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. कोणाला करू दिली नाही. अधिकारी वर्गाच्या मनमानी कार्यावर सडेतोड बोलणारे किंबहुना कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता ध्येयाशी बांधील रहाणारे म्हणून त्यांची ख्याती होती. जे अभ्यासू आणि शिक्षकांचे काळजीवाहू अधिकारी होते त्यांच्यासोबत त्यांचे उत्तम संबंध होते. गुहागर तालुक्यात सर्व शिक्षक वर्गात त्यांना मानाचे व आदराचे स्थान होते.
सर्व शालेय उपक्रमात त्यांचे स्वत:चे योगदान असे. मुख्याध्यापक म्हणून काम करताना सुध्दा ते स्वत: कामे करत असत. सुरूवातीपासून जादा तासिका घेत. आवश्यक तेथे विदयार्थ्यांना आर्थिक मदत करत असत. विदयार्थी सहकारी शिक्षक यातील कोणाला दुखले खुपले तर ते धावून जात असत. शिक्षक पतपेढीच्या 5 ते 10 सभासदांपासून 100 सभासद करण्यामध्ये, शिक्षक समितीला तालुक्यात नावारूपाला आणण्यातही बलंग गुरूजींचा मोठा वाटा आहे. माझ्या कुटुंबाच्या व शिक्षक समिती शाखा गुहागर व जिल्हा शाखा रत्नागिरीच्यावतीने कै.बलंग गुरूजी यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
सखा जीवाभावाचा
दिलीप अयाचित नंदू , सातारा
कै. नामदेव हा माझा अत्यंत जवळचा आणि जीवलग मित्र. आमच बालपण खूप वर्षे एकत्र गेल. त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. अत्यंत प्रामणिक व धाडसी वृती होती. त्याने सर्व नातेसंबंध अगदी मनापासून जपले. येणाऱ्या संकटांना त्याने लहानपणापासून र्धेर्याने तोंड दिले. ताठ मानेने, न हरता परिस्थितीला सामोरे जावे हेच तो शेवटपर्यंत शिकवून गेला. त्याचा हसतमूख चेहरा सतत डोळ्यासमोर येतो. आनंदी जीवन कसे जगावे हे त्याच्याकडून शिकावे. त्याच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.