३.६५ सर्वाधिक गुणांकन मिळालेलं राज्यातील पहिले विद्यापीठ
मुंबई, ता. १ : देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (नॅक) मुंबई विद्यापीठास ३.६५ सीजीपीए गुणांकन देण्यात आले आहे. नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
Mumbai University, one of the leading universities in the country, has been awarded A ++ status by NAAC. The National Assessment and Accreditation Council (NAAC) has given a CGPA of 3.65 to the University of Mumbai. Mumbai University has become the first university in the state to get the highest marks from NAAC.
नॅक पीअर टीमने दिनांक २४ ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान मुंबई विद्यापीठास मूल्यांकनासाठी भेट दिली होती. पहिल्या टप्प्याअंतर्गत नविन निकषानुसार विद्यापीठाने आयआयक्यूए आणि स्वयं मूल्यनिर्धारण अहवाल सादर केला होता. यामध्ये सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन- अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांचा समावेश होतो. दुसऱ्या टप्प्यांतर्गत विद्यार्थी समाधान सर्वेक्षण (स्टूडेंट्स सॅटिसफॅक्शन) सर्वेक्षण आणि विद्यापीठाने सादर केलेल्या माहितीची विधीग्राह्यता आणि पडताळणीची प्रक्रिया (डेटा व्हॅलिडेशन आणि व्हॅरीफिकेशन) प्रक्रिया पार पडते. यामध्ये ७० टक्के ऑनलाईन प्रक्रिया तर ३० टक्के पीअर टीमची प्रत्यक्ष भेट अशा स्वरूपात मूल्यांकन केले जाते.
प्रत्यक्ष भेटीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई विद्यापीठाने कोव्हिड-१९ संदर्भातील सर्व दक्षता पाळल्या आणि भेटीचे यशस्वी नियोजन केले होते. यामध्ये विविध समित्यांचे गठन करण्यात आले होते. नॅकच्या पीअर टीमच्या पहिल्या दिवसाच्या भेटी दरम्यान विविध १२ विभागांचे सादरीकरण तर दुसऱ्या दिवशी १५ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांचे सादरीकरण झाले. तत्पश्चात कुलसचिव, संचालक परिक्षा व मूल्यमापन मंडळ, वित्त व लेखा अधिकारी, आयक्यूएसी सेलचे सादरीकरण, विद्यार्थी, पालक, संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी पीअर टीमने संवाद साधला. त्याचबरोबर विविध विभागांना भेटी, प्रयोगशाळा पाहणी, पायाभूत सुविधा, ग्रंथालय भेटी देण्यात आल्या. यामध्ये अध्ययन व अध्यापन प्रणाली आणि संस्थात्मक मूल्ये आणि उत्तम उपक्रम विद्यापीठाच्या जमेच्या बाजू ठरल्यात. ज्यामध्ये हरीत उपक्रम, कौशल्याधारीत शिक्षण, मूल्यवर्धित शिक्षणक्रम, वारसा जतन आणि संवर्धन, ग्रंथालय यांचा समावेश आहे. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधनवृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
“देशांतील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ ची श्रेणीसह सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे. हे अत्यंत अभिमानस्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. विद्यापीठाच्या १६४ वर्षांच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. ज्ञानदानाची उज्वल आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाला मिळालेल्या या सर्वोत्तम श्रेणीचा फायदा हा विद्यापीठासह सर्वच भागधारकांना नक्कीच होईल. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व भागधारकांचे विशेष आभार मानतो.”
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
“मुंबई विद्यापीठाला नॅककडून ३.६५ एवढे गुण प्राप्त होऊन अ++ श्रेणी बहाल करण्यात आली ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल ते नॅक पीअर टीमच्या प्रत्यक्ष भेटीचे विशेष नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले. या कामी विद्यापीठाच्या आयक्यूएसी सेल आणि सर्वच घटकांनी अथक प्रयत्न घेतले. एकात्म सामूहिक प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती आहे. आता यानंतर मुंबई विद्यापीठाचे पुढील ध्येय असणार आहे ते सर्वसामान्य भारतीय नागरिकांस उच्च व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि संशोधन सुविधा प्राप्त करून देणारी श्रेष्ठताधारक संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स) म्हणून मान्यता मिळवण्याचं!”
– प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र- कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
“नॅक मूल्यांकनासाठी विविध निकषांची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठाच्या विविध भागधारकांनी अथक प्रयत्न केले. माहितीचे संकलन ते विविध अहवाल तयार करण्यासाठी व प्रत्यक्ष भेटीच्या नियोजनासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.”
-प्रा. स्मिता शुक्ला, आयक्यूएसी सेल, मुंबई विद्यापीठ