गुहागर, ता. 27 : आजपर्यंत 28 लाख 63 हजार रुपये कररुपाने देणाऱ्या प्रकल्पालाच पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे. 40 दिवसांपूर्वी तोडलेल्या 45 घरांच्या गृहप्रकल्पाचा पाणी पुरवठा अजुनही गुहागर नगरपंचायतीने सुरु केलेला नाही. यासंदर्भात मँगो व्हिलेजने जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान स्वतंत्र 45 नळ जोडण्या देण्याचा ठराव पाणी समितीने केला आहे. आम्ही पाणी देण्यास तयार आहोत. मँगो गृहप्रकल्पाने नळजोडण्यांसाठी आवश्यक साहित्य पुरवावे. असे नगरपंचायतीचे म्हणणे आहे. तर पाणी का तोडले, नळ जोडण्याबाबत काय निर्णय घेतला यासंदर्भात नगरपंचायतीने लेखी द्यावे. असे समीर काळे यांचे म्हणणे आहे.
गुहागर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा आणि शहराची प्रतिष्ठा वाढविणारा गृहप्रकल्प म्हणून मँगो व्हिलेजकडे पाहिले जाते. या गृहप्रकल्पात प्रशासनासह कार्पोरेट जगतात काम करणाऱ्या अनेक प्रतिष्ठीत लोकांचे बंगले आहेत. गुहागर तालुक्यात यशस्वी झालेले जे दोन तीन गृहप्रकल्प आहेत त्यामध्ये मँगो व्हिलेज या प्रकल्पाची नोंद होते. या प्रकल्पामधुन आजपर्यंत गुहागर नगरपंचायतीला घरपट्टी व पाणीपट्टी सोडून 28 लाख 63 हजार रुपये कररुपाने देण्यात आले आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात गुहागर नगरपंचायतीला घरपट्टीव्यतिरिक्त 5 लाख 48 हजार रुपये करांपोटी दिले आहेत. याशिवाय गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील शाळेला मँगो प्रकल्पाने देणगी दिली आहे. मात्र पाणी चोरीचा तोंडी आरोप करत नगरपंचायतीने प्रकल्पाचे पाणी तोडले आहे.
यावर्षी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही म्हणून नगरपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर, इतर आकारांमध्ये दुप्पट, तिप्पट वाढ केली आहे. मात्र तीच नगरपंचायत नेहमीच्या करांव्यतिरिक्त अन्य करांपोटी लाखो रुपये देणाऱ्या गृहप्रकल्पाचे पाणी तोडत आहे.
याबाबत मँगो व्हिलेजचे समीर काळे म्हणाले की, कायदेशीर कारवाई करायची असेल तर आधी कारणे दाखवा नोटीस पाठवावी लागते. लेखी पत्र द्यावे लागते. मात्र असे काही न करता थेट पाणी तोडण्याचे काम नगरपंचायतीने केले आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी व कोकण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. जर नगरपंचायत 3 इंची जलवाहिनी बंद करुन अर्धा इंची 45 नळ जोडण्या देणार असेल तर आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पत्र आम्हाला मिळाले पाहिजे.
या संदर्भात नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर यांच्याकडे विचारणा केली असता, पाणी समितीच्या विषयात मुख्याधिकाऱ्यांना कोणतेही अधिकार नाहीत. मुख्याधिकारी केवळ मार्गदर्शन करु शकतात. त्यामुळे या विषयात मी बोलु शकत नाही. असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, मँगो व्हिलेजमधील 45 घरांना स्वतंत्र 45 नळ कनेक्शन देण्याचा ठराव नगरपंचायतीच्या पाणी समितीच्या सभेत झाला आहे. सर्व सामान्य नागरिकांना नळ कनेक्शन मंजुर झाल्याचा निरोप गेल्यावर नागरिक घरापर्यंत पाणी नेण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देतात. त्याप्रमाणे मँगो व्हिलेजला पाणी दिले जाईल. नगरपंचायत जलवाहिनीतून नळ कनेक्शन देते. जो न्याय शहरातील नागरिकांना तोच न्याय मँगो व्हिलेजला. मात्र त्यांची नळ कनेक्शन मुख्य जलवाहिनीवर असल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा झाल्यानंतरच आणि साठवण टाकी भरल्यानंतरच त्यांना पाणी पुरवठा होईल.