गुहागर पंचायत समितीची मासिक सभेत कर्मचारी व अधिकारी यांना समज
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जनता विविध समस्या घेऊन आमच्याकडे येत असतात, अशावेळी प्रत्येक प्रशासकीय परिपत्रक व होणारे बदल याची माहिती लोकप्रतिनिधींना असणे आवश्यक आहे. आजपासून कार्यालयात मोबाईलचा वापर नको, जनता काम घेऊन येताना तुम्ही मोबाईलवर असे चित्र पुन्हा दिसू नये, यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज जबाबदारीने करावे, अशी समज कर्मचारी व अधिकारी यांना मासिक सभेतून सभापती व उपसभापती यांनी दिली. Monthly meeting of Guhagar Panchayat Samiti
गुहागर पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रणव पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महावितरण व दूरसंचार या दोन विभागाने दांडी मारल्याचे समोर आले. त्यामुळे या विभागाशी संबंधित प्रश्नांचा निपटारा होणे शक्य झाले आहे. या सभेतून सभापती, उपसभापती व सर्वच लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बोलणे ही सर्व माहिती इतर ठिकाणी कशी जाते यावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा पद्धतीचे वागणे यापुढे चालणार नाही अशी समज देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतींमधील १५व्या वित्त आयोगाचा खर्चिक निधी किती आहे याबाबतची सविस्तर माहिती देण्यात यावी, तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्यवहारासाठी आयसीआयसीआय बँक खरवते या ठिकाणी शासनाच्या निर्देशनानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची खाती उघडण्यात आली. यावेळी खरवते बैंक शाखेने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहकार्य करु असे सांगत दर आठवड्याला शाखेतील एक कर्मचारी पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्यासाठी उपलब्ध असेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आयसीआयसीआय बँक खरवते शाखा कोणतेही सहकार्य करत नाही. यामुळे या शाखेतील सर्व खाते बंद करण्यात यावीत व अन्य सहकार्य करणाऱ्या शाखेमध्ये उघडण्यात यावी, अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आला. Monthly meeting of Guhagar Panchayat Samiti
एमआरईजीएस कामाबाबतचा संपूर्ण आढावा घेत असताना ज्या ठिकाणी नेटवर्क नाही तेथील कामांचे मॅपिंग होणार कसे ही समस्या ही समोर ठेवण्यात आली. तसेच झालेल्या कामांचे तातडीने मस्टर पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना करण्यात आल्या. पंचायत समितीमधील प्रशासकीय कामकाज चांगल्या पद्धतीने चालवण्याकरता योग्य तो खाते बदल करावा, जागा निश्चिती करावी, कामचुकार कर्मचाऱ्यांची यादी तयार करुन त्यांच्या बदलीचा प्रस्ताव करावा अशी कठोर पावले यावेळी सभेतून उचलण्यात आली. परिणामी पंचायत समितीमधील प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी यावेळी मासिक सभेमध्ये विशेष चर्चा करण्यात आली. गुहागर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबतचा यावेळी निर्धार करण्यात आला. तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत बचतगट स्थापना करण्याबाबतचीही माहिती या सभेतून घेण्यात आली. यावेळी उपसभापती नीलेश सुर्वे, सर्व पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी तसेच सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. Monthly meeting of Guhagar Panchayat Samiti
