आमदार जाधव : सर्वांसोबत चर्चा करुन घेतला निर्णय
गुहागर, ता. 12 : मोडकाआगर धरणावरील नवीन पुल वहातूकीस खुला केल्यानंतर आता हा रस्ता पुन्हा 30 जूनपर्यंत बंद रहाणार आहे. जुना पुल मोडून तेथे भराव टाकणे, उर्वरित काँक्रिटीकरण पूर्ण करणे या कामासाठी ठेकेदाराने रस्ता बंद करण्याची मागणी केली होती. आमदार जाधव यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार, पत्रकार आणि कार्यकर्ते यांची चर्चा करुन या मागणीला अनुमोदन दिले.
शनिवारी (ता. 12) आमदार भास्कर जाधव यांनी मोडकाआगर धरणावरील नवीन पुलाची पहाणी केली. अधिकृतरित्या हा पुल वहातूकीस खुला होत असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे आश्र्वासनात दिलेल्या तारखेपूर्वी तीन दिवस पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
याच वेळी जुना पुल तसाच ठेवायचा की तोडायचा याबाबतची चर्चा अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता शेख यांनी जुना पुल तोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. ठेकेदारानेही रस्त्याच्या कामासाठीची 40 टन वजनाही मशिनरीची साततत्याने पुलावरुन वहातूक सुरु होती. तरीही पुलाला काहीही झालेले नाही. परंतू तांत्रिक कारणांमुळे हा पुल कागदोपत्री बंद आहे. आमच्या नियोजनात पुल पाडण्याचे काम पावसाळ्यानंतर करायचे होते. मात्र अधिकाऱ्याचा आग्रह असल्याचे सांगितले. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार यांच्याजवळ चर्चा केली. अखेर पावसाळा असल्याने सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे वहातूक कमी असेल. याच काळात पुल बंद राहीला तर वेगाने काम होवून जाईल. अशी चर्चा होवून मोडकाआगर धरणावरचा जुना पुल पाडण्यासाठी आणि गुहागरच्या रस्त्याचे काम वेगाने होण्यासाठी 30 जूनपर्यंत रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महामार्गाचे अधिकारी याबाबतची सूचना तहसीलदारांना देवून अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी बांधकाम सभापती दिपक कनगुटकर, विनायक जाधव, शिवसेनेचे गुहागर शहरप्रमुख नीलेश मोरे, युवासेना अधिकारी अमरदिप परचुरे, महामार्गचे उपअभियंता मराठे, लघुपाटबंधारेचे अधिकारी जगदीश पाटील आदी उपस्थित होते.