आमदार जाधव यांची प्रतिक्रिया
गुहागर, ता. 12 : येथील समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या कारवाईबाबत मी का म्हणून व्यक्त व्हायचे असा प्रतिसवालच आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आश्र्वासने दिली त्यांनाच हा संदर्भात विचारलेले बरे. माझी त्या खोकेधारकांविरोधात कोणतीही तक्रार नव्हती. खोकेधारकांना नोटीसा आल्यावर माझ्याकडे कोणीही मदत मागायला आलेच नव्हते. अशा वेळी आपण काही बोलणे चुकीचे आहे. असेही आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी सांगितले.


गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील अतिक्रमण हटाव कारवाईबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले की, मुळामध्ये भाजप सत्तेत असताना बंदर खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या खोकेधारकांना आश्र्वासने दिली होती. त्या आश्र्वासनांचे काय झाले हे त्यांनाच विचारले पाहिजे. भाजपचे जे कार्यकर्ते जेटी तोडताना, सी व्ह्यु गॅलरी तोडताना सेल्फी काढत होते. आनंद व्यक्त करत होते. त्यांना प्रतिक्रिया विचारल्या पाहिजेत. खोकेधारक, अन्य कार्यकर्ते पर्यटन राज्यमंत्री अदितीताई तटकरे आणि सुनील तटकरेंच्या संपर्कात होते. त्यामुळे आजच्या कारवाईबाबत त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत. गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी खोकेधारकांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याची भूमिका घेतल्याचे मी वाचले होते. त्यांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. ॲड. संकेत साळवी यांनी गुहागरकरांनी एकवटावे असे आवाहन केले. त्यांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. मी स्वत: खोकेधारकांच्या विरोधात कोणतीही तक्रार कधीच केली नाही. खोकेधारकांना अतिक्रमण हटाव संदर्भातील नोटीसा आल्यानंतर कोणीही माझ्याकडे आले नाही. आपण काय करु शकतो विचारले नाही. अशा वेळी मी कोणतीही प्रतिक्रिया का म्हणून द्यावी. मी व्यक्त का व्हावे. हीच माझी प्रतिक्रिया समजावी. असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

