

आपण कोण या ओळखीपेक्षा आपल्या शाळेची ओळख, विद्यार्थ्यांची ओळख जास्त महत्त्वाची. त्यासाठी जगणं. पडेल ते काम विना तक्रार करण. याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माळीसर. त्यांनी विनाअनुदानित शाळेचा ग्रंथालय विभाग सांभाळला. बोर्डाचे पेपर तपासण्याचे काम केले. सहशालेय उपक्रमांत मुलांना सहभागी करुन घेण्यासाठी धडपड केली. हिंदी अध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. सतत कार्यरत असणाऱ्या माळी सरांना निवृत्तीचे वेध लागलेले असतानच परमेश्र्वराने इहलोकातून निवृत्ती घ्यायला लावली. यामुळे शाळेत मोठी शैक्षणिक पोकळी निर्माण झाली आहे.
– (कु. विनोद विजय डिंगणकर, कुडली)


नामदेव पांडुरंग माळी यांचा जन्म बेटावद या गावी शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षणासाठी दाही दिशा असं म्हटल जात ते माळी सरांच्या बाबतीत खर ठरल. त्यांनी तळेगाव, जामनेर, जळगांव आणि मध्यप्रदेशात जावून आपले पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.बी.एड.) पूर्ण केले. 2 ऑगस्ट 1993 रोजी ते माध्यमिक विद्यालय कुडली या विद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले. शाळा विनाअनुदानित होती. त्यामुळे पगाराची रक्कमही तुटपुंजी. कुडली सारख्या ग्रामीण भागातील शाळा असल्यामुळे भौतिक सुविधांचीही कमतरता. अशा परिस्थितीशी जुळवून घेत माळी सरांचे अध्यापनाचे व्रत सुरु झाले.


मनमिळावू असल्याने पंचक्रोशीतील सुपरिचित शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अल्पावधीतच एक व्यासंगी शिक्षक म्हणून त्यांना कुडली पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागले. वाचन आणि लेखनाची त्यांना आवड होती. विद्यार्थ्यांना शिकविण्यातून, भाषणांमधुन, सहज गप्पा मारताना विविध उदाहरणे सांगणे यावरुन त्यांचा व्यासंग दिसायचा. सकारात्मक विचार करण्याच्या त्यांच्या स्वभावातून अनेकांना प्रेरणा मिळत असे. संघटन कौशल्य त्यांना ज्ञात होते. शाळा विनाअनुदानित असताना त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यावेळी शाळेतील सहकाऱ्यांना सोबत घेवून ते काम करण्याची त्याची हातोटी सहज लक्षात येत असे. समाजामध्ये मिळून मिसळून रहाण्याचा सहजभाव असल्याने पालकांमध्येही त्यांच्याबद्दल आदर होता. सर्वांना समजेल अशा पध्दतीने शिकविणे हा त्यांच्या हातखंड्याचा विषय. त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे ते विद्यार्थीप्रिय होते. शाळेचा कोणताही कार्यक्रम, उपक्रम असो शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा त्यामध्ये खारीचा वाटा का होईना असला पाहिजे. याकडे ते कायम लक्ष देत.


कुडली शाळेत ग्रंथालय विभाग त्यांनी आवडीने सांभाळला. कित्येक वर्ष शाळेच्या परीक्षा विभागाचे काम ते करत होते. इ. 10 वीचे पेपर तपासण्याचे कामही ते अनेक वर्ष करत होते. गेली 5 वर्ष कोकण बोर्डाचे हिंदी विषयाचे मॉडरेटर अशी जबाबदारीही त्यांच्याकडे होती. हिंदी हा त्यांचा मुख्य विषय असल्याने गुहागर तालुका हिंदी अध्यापक संघामध्ये ते कार्यरत होते. कित्येक वर्ष या संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले. आपल्या कामाचा, अनुभवसिध्द अध्यापनाचा व ज्ञानाचा ठसा कारकिर्दीवर उमटवणाऱ्या माळी सरांचे 10 जून 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
का ? कुणास ठाऊक आन् काय झाल… ।
सर तुमच्या अवेळी जाण्याने खंबीर डोळ्यात नकळत पाणी आलं ।।
आठवता भूतकाळ, कानी ऐकू येते हिंदीची ती अमोघ वाणी ।
अजूनही मन:पटलावर ठसलीय ती इतिहासाची आणीबाणी ।।
सदैव लक्षातच राहिला साध्या रहाणीतील मनमिळावू आचार्य ।
सर तुम्हीच आहात असंख्य अर्जुन घडविणारे द्रोणाचार्य ।।
जरी कधी बिघडवली आम्ही शाळेतील शिस्तीची घडी ।
प्रेमळ उपदेशानेच शिकविलीत आयुष्याची बाराखडी ।।
पेटविलात अंगार मनी, हाती दिली विद्येची समशेर आम्हाला ।
वाट पहातो आम्ही, यावे तुम्ही पुन्हा जन्माला… ।।
सर तुमच्यासाठी कमीच ठरतेय ह्या लेखणीती शाई ।
होऊ कसा मी तुमच्या ज्ञानदानाचा उतराई ।।