लवकरच अधिकृत अधिसूचना होणार जाहीर
गुहागर, ता. 13 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. या निर्णयावर राज्य सरकार येवून थांबले आहे. त्यामुळे राज्यात संपूर्ण टाळेबंदी करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. मंगळवारी (ता. 13) किंवा बुधवारी (ता. 14) अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रात टाळेबंदी घोषित करण्यासंदर्भात अनेक चर्चा सुरु होत्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्व पक्षातील प्रमुख मंडळींसोबत चर्चा केली. त्यानंतर राज्याच्या टास्क फोर्सबरोबरही चर्चा केली. या चर्चेतून टाळेबंदीला पर्याय नाही असाच निष्कर्ष समोर आला. टाळेबंदीचा कालावधी 15 दिवसांचा कि 21 दिवसांचा यावरही दोन मतप्रवाह आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत सोबतच निर्बंध कीती कडक असावेत याबाबतचे मुद्दे सध्या निश्चित करणे सुरु आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या प्रकारचा दिलासा द्यायचा याचाही विचार टाळेबंदीच्या अधिसुचनेबरोबर जाहीर होणार आहे. यापूर्वी राज्यातील जनतेला अनेकवेळा मास्क वापरा, गर्दी टाळा, सामाजिक अंतराचे भान ठेवा, विनाकारण घरातून बाहेर पडू नका, कोरानाचा धोका वाढतोय आदी संदेश देवून झाले होते. मात्र जनता हे निर्बंध पाळायला तयार नव्हती. त्यामुळे एप्रिल महिन्यात मिनि लॉकडाऊनची घोषणा राज्य सरकारने केली. त्यासोबत विकेंड लॉकडाऊन कडक केला. मात्र त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नाईलाजाने टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागत आहे. असल्याची माहिती गुहागर न्यूजला एका अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज सायंकाळपर्यंत राज्यात मोठा निर्णय होवू शकतो असे सांगत टाळेबंदीचे संकेत दिले होते. साखळी तोडण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने कडक निर्णयांची आवश्यकता आहे. कोरोनाची परिस्थितीवर हाताबाहेर जाण्यापूर्वी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत राज्यात मोठा निर्णय होवू शकतो असे सांगत टाळेबंदीचे संकेत दिले होते.
मुंबईत माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव आशिष सिंग तसेच आपत्कालीन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांसह वरिष्ठ सनदी अधिकारी कडक नियमावली करण्याबाबत काम करत आहेत. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील. सर्वसामान्य जनतेला कशापध्दतीने दिलासा देता येईल यावर आम्ही गंभीर आहोत.
राज्यात लॉकडाऊन जाहीर करत असतानाच गोरगरीब लोकांना फटका बसणार नाही. तसेच लॉकडाऊन दरम्यान परप्रांतीय जनतेला त्यांच्या घरी जाण्यासाठी कालावधी दिला जाईल. लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा, तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले होते.