पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक नरहर तथा नाना अभ्यंकर यांनी अनेक विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही घडवले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही निवृत्त मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी नानांची नाना रुपे उलगडून दाखवली आहेत.
चतुरंगचे मार्गदर्शक आदरणीय अभ्यंकर सर
गुरुवर्य एस.वाय.गोडबोले गुरुजींनी १९८६ साली चतुरंगच्या कोकण अभ्यासवर्ग उपक्रमाची सुरुवात ज्यांच्या नुसत्या सहकार्याने नव्हे तर ज्यांच्या श्रृंगारतळी येथील घराच्या ओसरी-पडवीवर केली ते चतुरंगचे मार्गदर्शक, शिक्षक, आदरणीय नरहर तथा नाना अभ्यंकर सर.
अभ्यंकर सर आणि सौ. शुभांगी अभ्यंकर मॅडम दोघेही संस्कृत-मराठीचे आदर्श शिक्षक होते. श्रृंगारतळी येथील शाळेत सर मुख्याध्यापक होते तर मॅडम तिथेच शिक्षिका म्हणून काम करीत असत. सुरुवातीच्या काळात चतुरंग कार्यकर्ते आणि शिक्षक मंडळी त्यांच्याच घरात मुक्कामाला असत. विद्यार्थी ओसरीवर, पडवीत, अंगणात अभ्यासासाठी येत आणि मॅडम स्वतः सगळ्यांसाठी घरात जेवण बनवत असत. असा चतुरंगवर्ग शाळांमध्ये सुरू होण्यापूर्वी सरांच्या घरीच होत असे…
शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कठोर असणारे नाना प्रत्यक्षात वागताना-बोलताना मात्र अतिशय गोड स्वभावाचे आणि कोणाशीही अत्यंत मृदू भाषेत बोलणारे लाघवी, प्रेमळ मनाचे होते.
पुढे चतुरंगचे निवासी अभ्यास वर्ग वहाळ येथे सुरू झाल्यानंतरही प्रकृती साथ देईपर्यंत सातत्याने नाना आणि शुभांगी मॅडम आवर्जून वहाळलाही शिकविण्यासाठी येत असत. त्यांचा त्या काळातील निवासी वर्गातला मुक्काम हा चतुरंगला घरातल्या आजी-आजोबांसारखा घरगुती कौटुंबिक जाणवत असे.. भावत असे ! सुमारे पस्तीसेक वर्षानंतरही चतुरंगशी तितकेच घरगुती नाते टिकून राहिलेल्या नाना अभ्यंकर सरांच्या निधनाने खूप हळहळ वाटते आहे.
स्वर्गीय गोडबोले गुरुजींच्या नंतर चतुरंग कुटुंबातली आणखी एक ऋषितुल्य गुरुवर व्यक्ती आज आपण गमावली आहे. या दोन्ही आदरणीय गुरुवर्यांचे साहचर्य आयुष्यभर अनुभवलेल्या कार्यकर्त्यांना, इथून पुढची चतुरंग वर्गातली त्यांची कायमची उणीव ही आता नेहमीच चुटपूट लावणारी एक दुःखद बाब असणार आहे.
दोन्ही गुरुवर्यांनी घालून दिलेला घरगुती वातावरणाच्या अभ्यासवर्ग उपक्रमाचा कित्ता आपण पुढे निरंतर चालू ठेवूंया…! हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल !!
विद्यार्थी प्रिय असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजेच अभ्यंकर सर
लेखक : प्रकाश बापट, निवृत्त मुख्याध्यापक
सरांना मी अनेक वर्षे ओळखत होतो त्यांचेकडे जाणे येणे असायचे पण माझा प्रत्यक्ष संबंध फक्त दोन वर्षेच (१९९३ ते १९९५ ) आला. मी तळवलीहून बदली होऊन शृंगारतळीला आलो तेव्हा. पण या दोन वर्षात नानांकडून अनेक गोष्टी शिकता आल्या.
शिस्त
मुलांना काय चांगले वाटते यापेक्षा मुलांसाठी काय चांगले ते सर निःसंकोचपणे करत असत. म्हणजेच ज्या ज्या मुलांनी नानांच्या हातचा भरपूर मार खाल्ला ती मुले त्यांची कायम आठवण काढतात; आणि त्यांच्यामुळे आज आम्ही जीवनात यशस्वी झालो. हे अभिमानाने सांगतात.
वक्तशीरपणा
नाना तासिका बदलाची बेल झाल्यावर लगेच वर्गाचा ताबा घेत असत. एखादे शिक्षक सहकारी तासावर न जाता स्टाफरुम बसलेले असतील आणि वर्गात कोणी नसेल तर त्या शिक्षकांना न रागावता सहज सांगायचे की, सर तुमचा तास आहे. तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही बसा मी वर्गावर जातो. क्षणाचाही विलंब न करता ती व्यक्ती न बोलता आपल्या वर्गावर जात असे.
कायम हसतमुखाने शाळेत येणाऱ्या माणसाचं स्वागत करणे हा त्यांचा हातखंडा विषय होता. सर्व शाळा ह्या त्या शाळेच्या नांवाने ओळखल्या जातात. अतिशयोक्ती होणार नाही पण शृंगारतळीची शाळा ही ‘नानांची शाळा’ म्हणूनच ओळखली जायची .
आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण कसे मिळतील हे पाहायचे. म्हणजे असे झाले सरांचा मुलगा वैभव हा दहावीत होता तेव्हा सर्वांनाच खात्री होती की वैभव बोर्डात येणार पण त्याला एक विषय सोडून बाकी सर्व विषयात उत्कृष्ट गुण होते. कमी गुण मिळाले तो विषय होता हिंदी. त्याकाळी दिर्घोत्तरी प्रश्न असायचे. म्हणजे पहिला प्रश्न ३० गुणांचा, दुसरा २० गुणांचा. या ठिकाणी अनेकदा आकारावर मार्क्स दिले जायचे आणि हुशार मुलांचे नुकसान व्हायचे. हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः संस्कृत शिकून शाळेत १०० गुणांचे संस्कृत सुरू केले. तेव्हापासून बोर्डात येणाऱ्या मुलांची परंपरा सुरू झाली.
हे जरी खरे असले तरी त्यांनी हिंदीचे मॉडरेटर असताना एकाही मुलावर अन्याय होऊ दिला नाही. याचीही एक आठवण आहे. अनेक वर्षे हिंदीचे परीक्षक असलेले एक शिक्षक त्यांनी तपासलेले पेपर नानांकडे आले. ते पाहिल्यावर त्या शिक्षकांना आधी पुढचे पेपर पाठवू नका. असे सांगून नानांनी त्यांना बोलावून घेतले. अर्थातच ते शिक्षक खूप संतापले. मी इतकी वर्षे पेपर तपासतो आहे हे मला काय शिकवणार. अशा आविर्भावात ते आले. नाना काय समजायचे ते समजले. नानांनी त्यांची विचारपूस केली. जेवण झाल्यावर पेपरचा गठ्ठा काढला. एक पेपर काढला. तो स्वतःकडे ठेवला. एक कोरा कागद त्या शिक्षकांना दिला. आणि म्हणाले सर, मी प्रश्नाचे उत्तर वाचतो तुम्ही त्या उत्तराला किती गुण देणार ते त्या कागदावर लिहा. अशाप्रकारे नाना वाचणार ते गुण लिहिणार अशी प्रक्रिया पूर्ण झाली. नंतर पेपरमध्ये त्यांनी दिलेले गुण आणि कागदावरचे गुण त्यांना दाखवले. वास्तविक दोन्ही गुण एकाच व्यक्तीने दिलेले पण तफावत खूप. न चिडता नानांनी वेगळ्या पद्धतीने त्यांची चूक दाखवली. मुलांचं नुकसान टळले. परीक्षकांना धडा मिळाला. कुठल्याही प्रकारचा त्रागा न करता किती सहज प्रश्न सोडवला अगदी हसत खेळत
असे होते आमचे नाना ! मी मुख्याध्यापक झाल्यावर त्यांची प्रकर्षाने आठवण होत असे. जाणीव होत असे की, ही नानांची खुर्ची आहे त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांच्यासारखे होता आले नाही तरी त्यांच्या कडून मिळालेल्या शिदोरीवर माझा काळ मी व्यतीत केला. त्यांच्याविषयी लिहिण्यासारखे खूप आहे. नाना जरी शरीराने नसले तरी आज प्रत्येकाचे हृदयात ते अजरामर असणार आहेत. त्यांचे आत्म्याला चिरशांती लाभो हीच परमेश्वरी प्रार्थना !
ज्ञानभास्कराचा अस्त
लेखक : नवरत सर
पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये 1972 पासून 1995 पर्यंत नरहर अभ्यंकर सर हे प्रदिर्घ काळ मुख्याध्यापक म्हणून काम करीत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अथक परिश्रम घेवून शिक्षण क्षेत्रात पाटपन्हाळे हायस्कूल नावारुपाला आणले. अभ्यंकर सर इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषा विषयांचे अध्यापन करीत असत. हे विषय शिकवत असताना ते त्यातील महत्त्वाच्या पाठ्यांशाचा भाग मुलांच्याकडून तोंडपाठ करुन घेत असत. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. संस्कृत विषय हा त्यांचा हातखंडा विषय होता. वर्गात विद्यार्थी अगदी आनंदाने ा विषयाचे अध्ययन करीत असत. ते अतिशय शिस्तप्रिय होते. वक्तशीर होते. एखादे शिक्षण काही अडचणींमुळे उशिरा येत असतील तर सर स्वत: त्यांचे तासावर जावून अध्यापन करीत असत. सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. गरीब असो वा श्रीमंत सर्व विद्यार्थ्यांना सारखा न्याय हा त्यांचा खाक्या होता. आज सरांचे अनेक यशस्वी विद्यार्थी आरोग्य, व्यापार, उद्योग, बांधकाम, शिक्षण इ. क्षेत्रात कार्यरत आहेत. यशस्वी आहेत. सरांच्या कार्यकाळातच संस्थेने ज्युनिअर कॉलेज, सिनिअर कॉलेज सुरू केले. त्यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांना हार्दिक सहकार्य केले. डॉ. तात्यासाहेब नातू यांच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र चव्हाण यांनाही सरांनी मौलीक सहकार्य केले. अशा ज्ञानाच्या सूर्याला कोटी कोटी प्रणाम.
मार्गदर्शक अभ्यंकरसर
लेखिका : सौ. वर्षा शरद पोंक्षे, निवृत्त मुख्याध्यापिका
सरांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा अनेक विचारांचा कल्लोळ मनात उमटला. माझ्या हायस्कूलच्या दिवसांपासून ते त्याच हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका आणि शेवटची चार वर्षे त्याच शिक्षण संस्थेच्या तळवली हायस्कूलमधून मुख्याध्यापिका या पदावरुन निवृत्त होण्याच्या दिवसापर्यंतचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की, आपल्या जडणघडणीत अभ्यंकर सर व मॅडमचा वाटा व मार्गदर्शन खूप मोलाचे असल्याने आपण हा पल्ला गाठू शकला.
साधारण 1971/72 चा काळ होता तो. आमचे मुख्याध्यापक आबा खरे यांच्यानंतर अभ्यंकर सरांची हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली. तेव्हा मी अकरावीच्या वर्गात होते. सरांकडे संस्कृत हा विषय होता. आम्हाला आठवीपासून संस्कृत हा विषय अभ्यासाठी नव्हता. पण सरांच्या कडक शिस्तीखाली आणि मार्गदर्शनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना लवकरच त्या विषयाची गोडी लागली आणि बोर्डाच्या परीक्षेत टक्केवारी वाढायला हा विषय कारणीभूत ठरला.
अकरावीनंतर त्याच्याच मार्गदर्शनाने डी.एड्. पदवी संपादन करुन त्यांनी मला तळी हायस्कूलमध्येच आग्रहाने घेतले. ज्या हायस्कुलमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले तेथेच त्याच शिक्षकांबरोबर मी नोकरीलाही लागले. शाळेत नोकरी करत असताना अनेक लहानमोठ्या, चांगल्या वाईट सर्व प्रसंगांमध्ये अभ्यंकर सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. त्याच्याच मार्गदर्शनामुळे नोकरी सांभाळून मी एम्. ए. बी.एड्. पूर्ण केले. एका मोठ्या हायस्कुलची विद्यार्थिनी ते मुख्याध्यापिका हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास करु शकले. मी एस.वाय.बी.ए.ला असताना त्यांनी मला एक विषय अवघड वाटत होता तो सुध्दा आपल्या सोप्या पद्धतीने शिकवला. त्याची आठवण आजही विसरता येत नाही.
केवळ आम्हाला दोघांनाच नाही तर माझ्या दोन्ही मुलींना सुध्दा त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे माझी मुलगी मुग्धा खेडेगावत शिकूनही, कोणतीही शिकवणी न लावता मेरीटमध्ये येऊ शकली. माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून सर निवृत्त होईपर्यंत सरांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांप्रमाणेच मीही त्यांची विद्यार्थिनी होते. हे सांगताना मला अभिमान वाटतो. त्यांच्या हाताखाली सहशिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते व त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते.
आदर्श व्यक्तिमत्त्व
लेखक : लेले सर, निवृत्त मुख्याध्यापक
नरहर अभ्यंकर यांचा जन्म केळे या रत्नागिरी तालुक्यातील एका छोट्याश्या खेड्यात झाला. बाळपणात परिस्थितीचे चटके सोसत शिक्षण घेणाऱ्या नानांकडे त्यावेळी साधनांचीही वानवा होती. तरीही कुशाग्र बुद्धीमत्तेच्या बळावर, हालअपेष्टा सोसून नाना एम.ए. बी.एड्. झाले. शिक्षण संपल्यावर ते हेदवकर विद्यानिकेत, हेदवी येथे नोकरी करु लागले. त्यानंतर पाटपन्हाळे विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे अभ्यंकर सर आणि अभ्यंकर मॅडम. साधी रहाणी, सरळमार्गी व्यक्तिमत्त्व, हिंदी इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही भाषांवर प्रभुत्व, योग्य तेच मार्गदर्शन करण्याची सवय, कडक शिस्तीचे भोक्ते आणि वक्तशीर शिक्षक असुनही विद्यार्थीप्रिय. शाळेच्या वेळेआधी शाळेत उपस्थित रहाण्याच्या त्यांची सवय नोकरीच्या कालखंडात कधीही मोडली नाही. मुख्याध्यापक म्हणून शालेय वातावरणावर सरांचा चांगला वचक होता. ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्य होती. मात्र तरीही अभ्यंकर सरांच्या वागण्यामुळे कटुता निर्माण झाली असं सांगणारा एकही शिक्षक किंवा विद्यार्थी भेटणार नाही. असं हे आदर्श व्यक्तिमत्त्व होतं.
आमचे लाडके नाना !
लेखक : काटदरे सर
जून 1972 ते सप्टेंबर 2007 या कालावधीत पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये मी शिक्षक म्हणून काम कले. 1972 पासून 1995 पर्यंत 23 वर्ष मला आमचे मुख्याध्यापक अभ्यंकर सर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. सरांना प्रेमाने आम्ही नाना म्हणायचो. त्यांच्या 23 वर्षांच्या सहवासात अनेक गोष्टी मी शिकलो. त्यांची काम करण्याची पध्दत, त्यांची शिस्त, मिश्किलपणा, मुलांना शिकविण्याची पध्दत यांचा माझ्यावर फार प्रभाव होता. ते जेवढे शिस्तप्रीय होते तेवढेच प्रेमळ होते. ‘‘वज्रादपि कठोरानी, मृदुनि कुसुमादपि ’’ हे त्यांचे वैशिष्ट्य. एक आदर्श शिक्षक, कुशल प्रशासक, प्रेमळ सहकारी आणि जणू मोठा भाऊ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सर्वांना बरोबर घेवून कामाची त्यांची आवड मला खूप भावली. त्यांच्याबरोबर 23 वर्ष केलेले काम कायम स्मरणात राहील. परमेश्र्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. हीच देवाला माझी प्रार्थना !