ही खड्यांची गौरी पार्वतीस्वरुप असते. कोकणातील डोंगराळ दगडधोंड्यांच्या प्रदेशातील ही गिरीजा ! ती पानाफुलात रमते. साधीसुधी राहते. तिला जंगलातील फुलं, पानांची वस्त्र, पातीचे दागिने, माळा, हार, फळांचा आहार, तांदुळाची खीर घाटलं आवडतं. म्हणून ही पृथ्वीस्वरुप.. पार्वती !
– लेखिका : सौ. नमिता वैद्य, आबलोली
कोकणात भाद्रपदात गणेशोत्सव सुरु झाला की ती तिन दिवसांनी भक्तांच्या घरी आलेल्या गणपतीबाप्पा बरोबर खड्याच्या गौराई आणण्याची पद्धत आहे. सुवासिनीं , मैत्रिणीसह पाणवठ्यावर म्हणजे नदीकाठी,ओढ्याकाठी, विहिरीकाठी एकत्र जमतात. तिथे झिम्मा-फुगडीचा फेरही रंगतो. घागर घुमु दे घुमु दे म्हणत आनंद लुटला जातो.
बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीचे सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायला
रूणूझुणूत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तीला लिंबलोण करा
गौर आली गौर आली – सोन्या- रूप्याच्याच्या पावलांनी,
गौर आली गौर आली – सुख -समृद्धीच्या पावलांनी,
गौर आली गौर आली – दह्या- दुधाच्या पावलांनी,
गौर आली गौर आली – आयू -एैश्वर्याच्या पावलांनी
अशी पारंपरिक गीते गौरी आणताना गायली जातात. पाच, सात, अकरा, एकवीस असे खडे घेतले जातात. त्यामध्ये जगत्जननी गौराईचं रुप समजून खड्यांना दुध, उनं पाण्यानं (गरम पाणी) न्हाऊमाखु घातलं जात. विधिवत् पूजा करुन नाचत, गाजत, गाणी म्हणतं, घरी आणलं जात. औक्षण करुन घरात आल्यावर गौरीला संपुर्ण घर दाखवले जाते. ओटी, पडवी, माजघर, माळा, स्वयंपाकघर,फडताळ धान्याचं कोठार, कपड्यांचं कपाट, पैशाचं पाकीट, असं सगळं घर दाखवलं जातं. प्रत्येक ठिकाणी गौराई आशिर्वाद देते “उदंड आहे!”
आपल्या भक्तांकडे जे आहे ते छान आहे, जितकं आहे तितकं भरपूर आहे, जिथे ठेवलं जाईल तिथे आनंदठाण, गौरी जे असेल त्यात तृप्त होते, भक्तीभावाने आनंदाने दिलेली सेवा समाधानाने स्विकारते. खीर,घावन घाटलं हसतमुखाने सेवन करते. राहते. पाहते. आणि शांत होवून निघताना आपल्याला शिकवण देवून जाते.
“जे आपल्याकडे आहे ते उदंड आहे”
असं समजून हसून जगावं…कारण गरजा अनंत असतात पण समाधान या एक उत्तराने जीवन सुखी होतं. म्हणून म्हणावं….. उदंड आहे.
इथे इथे काय गं, गौराईचे पाय गं, उंब-याला ठेवली मी काळजाची साय गं
इथे इथे काय गं, गौराईचे हात गं, औक्षणाला घेतली मी नयनांची वात गं
इथे इथे काय गं, गौराईचा पाट गं, तोरणाला बांधला मी पापणीचा काठ गं
इथे इथे काय गं, गौराई चे ताट गं, जेवणाला घावनाचा-घाटल्याचा घाट गं
इथे इथे काय गं, गौराईच्या खुणा गं, गौराई गौराई लागे छंद माझ्या मना गं
इथे तिथे समाधान, उदंड उदंड गं, गौराई ने दिले सुख अखंड अखंड गं!
सगुण-निर्गुण गौराई!
‘लोकांकडे मुखवट्याच्या गौरी, आपल्याकडे खड्यांच्या गौरी का?’ हा प्रश्न माझी कन्या आणि पुतणी यांनी मला विचारला . मग चर्चा, जून्या संदर्भाचा शोध, म्हाताऱ्या माणसांशी प्रथा समजून घेणे, इंटरनेट,व्हॉट्स अॅप वरची माहिती अशी शोधाशोध झाली.संत वाङ्मयाशी याचा संबंध जेव्हा जोडला गेला तेव्हा सगुण-निर्गुणाचा विचार आला.
आपल्या पूर्वजांना आपण कर्मठ ठरवून मोकळे होतो. वास्तविक, ते आपल्यापेक्षा जास्त फ्लेक्सिबल होते. कशावाचून काही अडू न देता प्रसंगी सुपारी ठेवून काम भागवण्याची कला त्यांना अवगत होती. अशाच एखाद्या प्रतिकूल परिस्थितीतून खड्यांच्या गौरीची निर्मिती झाली असावी. कदाचित आज कोरोना सारख्या संकटात ऑनलाईन होणाऱ्या अनेक गोष्टींप्रमाणेच असेल. दगडातही देवपण शोधणारी आपली संस्कृती. निसर्गाची पूजा आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणारी आपली मूल्य, परंपरा आपल्याला सणांच्या निमित्ताने निसर्गाजवळ नेते.
खड्यांना मूर्त रूप नसतानाही, त्यात देवत्व पहायचं. म्हणजे निर्गुणातही सगुणाचा साक्षात्कार अनुभवायचा. नाकी डोळी निट्स असलेली मूर्ती मन मोहून घेते, तशीच आकार-उकार नसलेली, शेंदूर लावलेली गणपती, देवी, हनुमानाची मूर्तीही देवत्वाची प्रचिती देते आणि नतमस्तक व्हायला लावते.
याचाच अर्थ असा, ‘ऊस डोंगापरी, रस नोहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा?’ नुसत्या रंग-रूपावर न भाळता, गुणांची पारख करा आणि निर्गुणातही आनंद आहे, त्याचा अनुभव घ्या, अशी त्यामागची भावना असावी.
कुमारिकेचे पूजन, का? कारण ती अल्लड असते, निरागस असते, राग-लोभापलीकडे असते. वयात आल्यावर आपल्याला अनेक वासना, विकार जडतात. कुमारिकेच्या बाबतीत तसे नसते, ती बाला आनंदून गेली, तर मनापासून सदिच्छा देते, तेच आपल्या घरासाठी शुभाशीर्वाद मानायचे, असा त्याचा अर्थ असावा.
गौराई घरी आल्यावर सौभाग्यवतीची ओटी भरणे, गौरीबरोबर तिलाही जेवून-खाऊन तृप्त करून पाठवणे, ही तिच्या रूपाने आलेल्या गौरीची मानसपुजाच आहे. कामाच्या धबाडग्यात अडकलेल्या गृहिणीच्या नशिबात गरम गरम जेवण फारच दुर्मिळ असतं. म्हणून तर अलीकडे, ती कामाचा कंटाळा आला, की असहकार पुकारून हॉटेलमध्ये जाऊया, म्हणून घोषित करते. आयतं जेवण आणि जेवणानंतरचा पसारा आवरून मिळणे, हा तिचा मुख्य स्वार्थ असतो. पूर्वी, तशी सोय नव्हती. म्हणून सवाष्ण जेवू घातली जात असे. त्यानिमित्ताने एक वेळची, तिची कामातून, पसाऱ्यातून सुटका. घरचं सात्विक, ताजं, गोडाधोडाचं जेवण झाल्यावर आपसूक ती तृप्त होऊन यजमानांना आशीर्वाद देऊन जात असे. ज्याला आपण शुद्ध मराठीत ‘पॉझिटिव्ह वाईब्स’ म्हणतो. त्या मिळवण्याचा हा पारंपरिक मार्ग!
आपल्या सणांचं, परंपरांचं ‘शास्त्र असतं ते’ म्हणत अंधानुकरण न करता, त्यामागचा अर्थ जाणून, समजून घेतला, तर उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. मग खड्यांमध्येही गौरी दिसू लागते, तेही रंगरंगोटी न करता!