रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन व सरस्वती देवीच्या नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पुस्तक विक्री केंद्राचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. वाचकांना येथे सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत आणि वाचनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Inauguration of book sale center in Ratnagiri
रत्नागिरीमध्ये या पुस्तक विक्री केंद्राच्या माध्यमातून हे नवे पुस्तक दालन वाचक प्रेमींसाठी उपलब्ध झाले आहे. रत्नागिरीतील पुस्तक प्रेमी, वाचकांच्या उपस्थितीत हे केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी आनंद पाटणकर, मालती खवळे, श्री. रानडे, चंद्रशेखर पटवर्धन, राजा प्रभू, वाचक, वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. या केंद्राकरिता राजहंस प्रकाशन संस्थेचे सहकार्य लाभले आहे. पुस्तके येथे सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जातील. लवकरच अन्य प्रकाशन संस्थांचीही पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही सर्व पुस्तके भरीव सवलतीसह विक्रीसाठी या केंद्रावर उपलब्ध होतील. लहान मुलांकरिता गोष्टी, रहस्यकथा, यांसह ललित लेखन, काव्यसंग्रह, आत्मचरित्रे, धार्मिक विषयक अनेक पुस्तके या केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Inauguration of book sale center in Ratnagiri
रत्नागिरी हे सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. वाचनालयातही मोठी वाचक संख्या आहे. परंतु अद्ययावत पुस्तक विक्रीचे दुकान नसल्यामुळे अनेकांना बाहेरगावाहून पुस्तक मागवावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी वाचकांना पुस्तक खरेदी करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. ग्रंथप्रेमी आपल्या आवडीची पुस्तके बघून पुस्तके सवलतीच्या दरात खरेदी करू शकतील. लहान मुलांचे वाढदिवस असो, किंवा विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये मिळवलेले यश असो, त्यांना पुस्तकरूपी भेट दिली तर तो आनंद द्विगुणित होईल. त्यामुळे सुजाण रत्नागिरीकरांनी आवर्जून पुस्तके खरेदी करून या वाचन चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. Inauguration of book sale center in Ratnagiri