सार्वजनिक बांधकाम : खात्याची प्रतिमा मलीन करणे योग्य नाही
गुहागर, 13 : सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने गणेशोत्सवापूर्वी निधी नसताना तालुक्यातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला आहे. वेळंब मार्गावरील मोरीचे काम झाले असते आजची परिस्थिती उद्भवली नसती. मात्र विरोधामुळे दोन वर्ष हे काम अपूर्ण आहे. असा खुलासा सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या उपअभियंता सलोनी निकम यांनी केला आहे.
(PWD Department Guhagar’s Sub Engineer Saloni Nikam Said, Tarnishing The image of Public Works Department doesn’t seem right. We will co-operate fully as a responsibility.)
पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वेळंब फाटा नजिक दुचाकी शोरुमजवळ मोठा खड्डा आहे. हा खड्डा का भरला नाही. अपघात झाल्यास जबाबदार कोण. असे प्रश्र्न भाजपचे गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी उपस्थित केले होते. तर सार्वजनिक बांधकाम दूर्लक्ष करत असल्याचे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले. या संदर्भातील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खुलासा केला आहे.
शाखा अभियंता महेश नित्सुरे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी सदरच्या ठिकाणी पाईप टाकण्यासाठी मशिनरी आली असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्याठिकाणी पाईप टाकून दिलेले नाहीत. त्यानंतर मी स्वतः पाईप टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा विरोधामुळे पाईप टाकण्याच्या कामामध्ये अडथळा आला. त्यानंतर सरपंचांसमवेत पाहणी केली असता मोरीच्या पुढे ४० ते ५० मीटर गटार काँक्रीटने बांधून कॉजवेवर पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली. या विषयाबाबत ८ सप्टेंबर २०२१ ला माजी उपसभापती सुनिल पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी ग्रामस्थांचे सहकार्य मिळेल असे आश्र्वासन त्यांनी दिले आहे. आता गणेशोत्सवानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
उपअभियंता सलोनी निकम म्हणाल्या की, गुहागर तालुक्यातील रस्त्यावरील झाडी तोडून, गणपतीपूर्वी खड्डे भरुन बहुतांश रस्ते सुस्थितीत करण्यात आले. तसेच गुहागर बाजारपेठेतील व आबलोलीतील खड्डे काँक्रीट ने भरून घेण्याचे काम कोणतीही मंजूरी नसताना केले आहे. परंतु एखादा खड्डा तांत्रिक कारणामुळे भरला गेला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाला दोष देणे, योग्य नाही. सणाच्या वेळेस एखाद्या खात्याची प्रतिमा मलीन करणे, योग्य वाटत नाही. आपण सर्वांनी या बाबतीत सहकार्याची भावना ठेवावी. सार्वजनिक बांधकाम खाते एक जबाबदारी म्हणून पूर्ण सहकार्य करेल याची आम्ही ग्वाही देतो. वेळ आल्यास नियमांचे बाहेर जाऊन काम करण्याची आमची तयारी आहे. परंतु काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केल्यास त्याचे पडसाद चांगलेच उमटतील असे वाटत नाही. लहान कामांसाठी विभागाकडून मंजुरी नाही. निधी नाही. अशा प्रकारची थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढूपणा करणे याची आम्हाला सवय नाही. विरोध झाला नाही तर, आठ दिवसात शृंगारतळी येथील हिरो होंडा शोरूम जवळ पाईप टाकून रस्ता सुस्थितीत करू देवू. सहकार्य करावे.