पुल पाण्याखाली गेल्याने तीन मार्ग बंद, म्हैस गेली वाहून
गुहागर, ता. 12 : गुहागर तालुक्याला रविवारी (ता. 11) आणि सोमवारी (ता. 12) पावसाने झोडपून काढले. तालुक्यात 156.4 मिमि पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खोडदेच्या वाकी नदीला पूर आला. आबलोलीतून भातगाव आणि मुर्तवडेकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. पालशेत बाजारपुल चार तास पाण्याखाली होता. पडवे येथे नाल्यामध्ये एक म्हैस वाहून गेली. तर उमरोली (ता. चिपळूण) येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने तीन तास चिपळूणकडील वहातूक ठप्प होती. सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला.
तालुक्यातील गुहागर मंडलात 106 मिमि, पाटपन्हाळे 172 मिमि, आबलोली 207 मिमि, तळवली 165 मिमि, हेदवी 132 मिमि पावसाची नोंद झाली. आबलोली मंडलात खोडदे – आबलोली मधुन वाहणाऱ्या वाकी नदीचे पाणी अनेक नारळी पोफळींच्या बागांमधुन शिरले. या नदीचे पाणी 2 पुलावरुन वेगाने वहात असल्याने आबलोलीतून मुर्तवडे, वहाळकडे जाणारा तसेच असोरे, शिवने मार्गे भातगांवला जाणारा हे दोन्ही मार्ग सोमवारी सकाळी बंद झाले होते. कोतळूक गावातून वहाणारी नदीला पुर आल्याने अनेकांच्या शेतात पाणी पुराचे पाणी शिरले. हे पाणी कमी होत नाही तोपर्यंत शेतीचे किती नुकसान झाले आहे हे कळणार नाही. पालशेत येथील बाजारपुल सकाळी 10 च्या दरम्यान दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. दुपारी 3 च्या दरम्यान पाणी ओसरु लागले. तोपर्यंत पालशेत ते अडूर, हेदवी, नरवण रस्ता अवजड वाहनांची बंद झाला होता. दुचाकी व छोटी वाहने बारभाई, गोवर्धन बाग मार्गे मारुतीमंदिर कडून जात होती.
तालुक्यातील पडवे गावातील वसंत गणपत राऊत यांच्या मालकीच्या चार म्हैशी सोमवारी (ता.12) सकाळी चरण्यासाठी काताळे नवानगर परिसरात नेल्या होत्या. तेथून परत येत असताना ‘डावाचा प-या’ या नाल्याला पूर राऊत यांच्या तीन म्हैशी व एक रेडकू या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. यापैकी दोन म्हैशी व रेडकाला वाचवण्यात राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. मात्र एक म्हैस या ओढ्यातून वाहून जाऊन जयगड खाडी मध्ये गेली. ही म्हैस मृत पावली होती. या घटनेचा पंचनामा ग्रामसेवक व तलाठी यांनी केला. जाफराबादी म्हैस मृत पावल्याने 1 लाख व अन्य दोन म्हैशी व रेडकाच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई नोंदविण्यात आली आहे.