गुहागर, ता. 03 : तालुक्यात सलग तीन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध गावांमध्ये घरांवर झाडे कोसळणे, घरांचे अंशतः नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. Heavy rain in Guhagar

मौजे गोणवली येथे श्री दिनेश शिवराम आग्रे यांच्या घराच्या भिंतीचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे कारूळ येथे श्रीमती प्रतिभा प्रभाकर मांडवकर यांच्या घराजवळील फणसाचे झाड कोसळल्याने त्यांच्या अंगणातील फळबागेचे नुकसान झाले. मौजे काताळे येथे श्रीमती आनंदी यशवंत बारस्कर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. तसेच मौजे भातगाव (उधळवाडी) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या शेडवर झाड कोसळून नुकसान झाले असून या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, मौजे गुहागर येथे श्री दिलीप भिकाजी सावंत यांच्या घराच्या पडवीचे अंशतः नुकसान झाले आहे. Heavy rain in Guhagar

याशिवाय, आबलोली–रत्नागिरी राज्य महामार्गावरील पेट्रोल पंपासमोरील मोरी पूर्णपणे तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून संबंधित यंत्रणेने तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून संबंधित घटनांचे पंचनामे पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. Heavy rain in Guhagar

