ओझे रहित प्रवास ( Burden less Journey) करा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो, आजची सुरुवात एका उदाहरणाने..
मित्रांनो तुम्ही उपग्रह अवकाशात सोडताना कधी पाहिलंय का?
उपग्रह अवकाशात सोडताना ( Satelite Launching च्या वेळी), त्या उपग्रहाच्या बुडाशी प्रचंड आवाज, आग आणि धूर निर्माण होत असतो आणि त्यानंतर तो उपग्रह अवकाशात झेप घेतो. ठराविक अंतर गेल्यावर त्यातील एक पार्ट मुख्य उपग्रहापासून वेगळा होतो व त्याला हवेमध्येच उध्वस्त (Destroy) केले जाते. मग त्या उपग्रहाचे स्पीड वाढते. अजून थोडे अंतर गेल्यावर अजून एक पार्ट अलग होतो व तो सुद्धा हवेमध्ये डिस्ट्रॉय केला जातो. मग पुन्हा त्या उपग्रहाचे स्पीड वाढते. मग अजून काही अंतर गेल्यावर अजून एखादा पार्ट वेगळा होतो.
मित्रांनो उपग्रहापासून वेगळे करण्यात आलेल्या प्रत्येक भागाची गरज असते. त्या प्रत्येक पार्ट मुळेच त्याला वर जाण्यासाठी ऊर्जा निर्माण होत असते. एका ठराविक अंतरावर गेल्यावर नको असलेले पार्ट काढून टाकले जातात. कारण त्यावेळी त्याला त्याची गरज नसते. शेवटी त्या उपग्रहाला आवश्यक असणारे तेवढेच भाग व तेवढेच वजन त्याच्यासोबत ठेवले जातात. नको असलेले वजन कमी झाल्यामुळे, उपग्रहाचे स्पीड वाढलेले असते व तो एकदम व्यवस्थित, गतिशील त्याच्या कक्षेमध्ये फिरायला लागतो व त्याचे इच्छित ध्येय गाठण्यास तो तयार असतो
मित्रांनो आपण देखील खूप सार्या प्रकारचे बर्डन, ओझे घेऊन प्रवासाला चाललो आहोत. तुमच्या देखील बुडाशी प्रचंड आग लागलेली आहे, तुमच्या जीवनात देखील धुराचे साम्राज्य पसरलेलं आहे. हे बर्डन, हे ओझे नक्की कशाचे आहे? हे ओझे आहे आर्थिक प्रश्नांचे, हे ओझे आहे वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदारीचे, हे ओझे आहे मानसिक दडपणाचे, हे ओझे आहे सामाजिक बांधिलकीचे, हे ओझे आहे आपल्यामध्ये असणाऱ्या नकारात्मक आठवणींचे. आपण घरासाठी, कारसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी कर्ज काढतो, परंतु काही वेळेला ते कर्ज फेडणे आपल्याला जमत नाही. मग ते मोठे घर, ती कार, मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टी आपल्याला ओझं वाटू लागतात.
अनेक वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर तुमची सासू तुमच्या वडिलांना काही वाईट बोलली होती, तिने तुमच्या वडिलांचा अपमान केला होता. तो अपमान तुम्ही अजूनही विसरलेला नाही आहात, ते शब्द अजूनही तुमच्या डोक्यात घुमत आहेत व त्यामुळे सासू बद्दल तुमच्या मनात कटूता निर्माण झाली आहे. तशा प्रकारच्या भावना तुमच्या मनात येत असतात. हे एक प्रकारचे भावनिक ओझे आहे.
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुमचा जोडीदार खूप उशिरा घरी आला. मागे एकदा त्याने तुमचा चार चौघात अपमान केला होता. किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाही अशा प्रकारची तक्रार बऱ्याच लोकांची असते. जोडीदाराबद्दल तुमच्या मनात कटूता निर्माण झालेली असते. परंतु समाजाच्या भीतीने व मोठ्या लोकांच्या धाकाने तुम्ही संसार करत असता, अशावेळी तुमच्या जोडीदाराबद्दल असलेल्या नकारात्मक भावना हे तुमचं ओझं बनलेल्या असतात.
काही महिन्यापूर्वी तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला उलट बोलली होती, त्याचा राग तुमच्या मनात अजूनही आहे. अशी घटना जर पुन्हा कधी रिपीट झाली तर आपण त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो. तुमच्या मुलांविषयी असणारा राग व चिड देखील एक प्रकारचे बर्डनच आहे. तुमची मैत्रीण तुमच्या माघारी दुसऱ्या मैत्रिणीपाशी काहीतरी बोलली होती, असे तुम्हाला समजले. आणि मग तुमचे त्या मैत्रिणीशी संबंध हळूहळू कमी व्हायला लागले. तुमच्या मनात तिच्याबद्दल आकस निर्माण होऊ लागला. काहीही कारण नसताना तिने प्रत्यक्ष तुम्हाला काहीही बोलले नसताना, तुम्ही फक्त कानावर विश्वास ठेवला आणि एवढ्या वर्षाची तुमची मैत्री तुम्ही संपवायला निघालात. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही त्या मैत्रिणीला फोन देखील केलेला नाही. तिच्याबद्दलच्या नकारात्मक भावनांचे ओझे तुम्ही आजही मनात वागवत आहात.
तुमच्या आई-वडिलांनी तुमच्या ऐवजी दुसऱ्या भावाला किंवा बहिणीला संपत्तीतील जास्त वाटा दिला, याचा राग तुम्हाला आला व तुम्ही त्यांच्याशी बोलणे बंद केले. तुमच्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, तुमच्या आई-वडिलांच्या बद्दल तुमच्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागली. आज अनेक वर्षे झाले तरीदेखील तुम्ही त्यांना माफ केलेले नाही. ज्या ज्या वेळी तुम्हाला ते भेटतात किंवा त्यांचा विषय निघतो, त्या त्यावेळी तुम्ही अस्वस्थ होता, हे पण एक भावनिक ओझेच आहे.
तुमच्या हातून अनेक वर्षांपूर्वी नकळतपणे काहीतरी चूक झाली होती, ती चूक तुम्हाला आजही सतावत आहे. तुम्ही एखादा निर्णय तुमचा एखादा निर्णय चुकीचा ठरलेला असेल, या अशा गोष्टीमुळे तुम्ही वारंवार स्वतःला दोषी समजत आहात. हे देखील एक प्रकारचे ओझेच आहे. तुमच्याबरोबरच्या मित्रांची, मैत्रिणींची लग्ने झाली, त्यांना मुलं पण झाली आणि अजून तुमचे लग्न जमेना. तुम्ही स्वतःला कमी लेखू लागलात. “तुम्ही स्वतः दिसायला सुंदर नाही. तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. तुम्हाला इतरांशी कसे वागायचे हे समजत नाही” असे तुम्हाला नेहमी वाटत राहते. मित्रांनो स्वतःला कमी लेखणे, हे देखील एक ओझेच आहे.
मित्रांनो स्वतःबद्दलचा किंवा इतरांबद्दलचा राग, द्वेष, मत्सर, गिल्ट, ही सर्व भावनिक ओझी आहेत. जोपर्यंत तुम्ही हे ओझे घेऊन चालला आहात, तोपर्यंत तुमचा प्रवास आनंदाचा सुखाचा होणार नाही. तसेच तुमची कामे लवकर होणार नाहीत, या सर्व गोष्टी तुमच्या कामातील अडथळा आहेत. त्यामुळे तुमची स्वप्ने पूर्ण होण्यास उशीर होत आहे.
मित्रांनो या सर्व गोष्टींची तुम्हाला आत्तापर्यंत गरज होतीच. याच नकारात्मक लोकांनी तुमच्या मध्ये बदल घडवण्यास प्रवृत्त केले. तुमच्या स्वतःबद्दलच्या तुमच्या वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदारीमुळेच तुम्ही अनेक गोष्टी शिकलात. प्रत्येक ठिकाणी नकारात्मक गोष्टीतून तुमचा काहीतरी विकासच झालेला आहे.
हा! परंतु इथून पुढे देखील ही सर्व ओझी तुम्हाला शेवटपर्यंत न्यायची नाहीत. आतापर्यंत तुम्ही भरपूर ज्ञान मिळवलेले आहे. बरेच बरे वाईट अनुभव तुम्हाला आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायला हवे आणि काय नको याची जाणीव झालेली आहे. तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहे.
तेव्हा आजपासून ही सर्व ओझी कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मनावर घेतले तर हळूहळू एक एक ओझे कमी होत जाईल. पैशाचे योग्य नियोजन करा. तुमच्या व कुटुंबाच्या गरजा ओळखा, नकारात्मक लोकांच्या पासून दूर रहा. तुम्ही आतापर्यंत जे निर्णय घेतलेत ते त्यावेळी योग्यच होते. त्यामुळे त्याबद्दल स्वतःला कोणताही दोष देऊ नका. प्रत्येक प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी योग्य सल्ला घ्या. हे ओझे कमी झाले आणि तुम्हाला योग्य दिशा मिळाली की तुमचा जीवनाचा प्रवास अत्यंत सुखद आनंदमय होणार आहे. तुमच्या जीवनातील आग आणि धूर आता नाहीसा होणार आहे
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -14 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद,
तुमच्या ओझेरहित (Burdenless Journey) सुखकर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा