शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती अधिकारी रस्त्यावर
गुहागर, ता. 20 : आज शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या 25 ग्रामस्थांची तपासणी केली. त्यामध्ये 4 ग्रामस्थ कोरोनाग्रस्त होते. याशिवाय तालुक्यात 3 दुकानदार आणि 14 वाहनचालकांवरही थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे 12 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
On Tuesday Guhagar Tahsildar, Block Development Officer, Medical Officer, Circle, Gram Development Officer are taken action against 25 People. In their antigen test 4 corona affected peoples found. Also Police taken action against Transporter, Motorcycle driver and Shopkeepers. In this action Officers recovered Rupees 12,800 fine from Them.
राज्यात संचारबंदी लागून देखील तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आज तहसीलदार सौ. लता धोत्रे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. देवीदास चरके आणि पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम, मंडल अधिकारी माखजनकर, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बेंडल यांनी शृंगारतळीत धडक कारवाई केली. प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या मदतीने रस्त्याच्या कडेलाच कोरोना तपासणी केंद्र उभे करण्यात आले होते. अधिकारीच रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवू लागले. प्रत्येकाची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाभरे गावातील 2, पाली, दाभोळ मधील प्रत्येकी 1, असे 4 ग्रामस्थ कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. हे सर्वजण तरुण असल्याने त्यांना स्वगृही विलगीकरणात रहाण्याच्या सूचना देवून घरी पाठवण्यात आले आहे. आरोग्य विभागाने तेथील आशा सेविकांना याबाबतची माहितीही दिली आहे. या कारवाईत चिखलीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुदेश हडकर, पोलीस कर्मचारी प्रतिक रहाटे, राजु कांबळे व मोहिते यांनी अधिकाऱ्यांना मदत केली.
गुहागर पोलीसांनी पोलीस निरिक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानदार आणि वहातुकदार यांच्यावर कारवाई केली. वेळंब रोड ते पालपेणे रोड दरम्यान सुरु असलेल्या प्रत्येक दुकानात जावून पोलीस आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मागत होते. यावेळी शृंगारतळीतील ग्रामपंचायत इमारतीमध्ये असलेले महा ई सेवा केंद्र आणि के.जी.एन. कापड दुकान परवानगी नसताना सुरु असलेले लक्षात आले. त्यामुळे पोलीसांनी दोन्ही आस्थापनांकडून प्रत्येकी 1000 रु. दंड वसुल केला. दुकान बंद करण्यास सांगितले. त्याचबरोबर आरटीपीआर चाचणी न करता वहातूक करणाऱ्या तसेच मोटार अधिनियम कायद्याने आवश्यक कागदपत्रे गाडीत नसलेल्या 10 वहातुकदारांकडूनही प्रत्येकी 1000 रु. दंडाची कारवाई केली. तर ४ दुचाकी चालकांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे पोलीसांनी दंड वसुल केला. या कारवाईमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु कांबळे, वैभव चौघुले व मोहिते सहभागी होते. आजपर्यंत पोलीसांनी शृंगारतळी परिसरातील सुमारे 30 व्यावसायिकांवर कारवाई करुन दंड वसुल केला आहे.
गुहागर शहरातील नंदुशेठ बारटक्के यांचे मे दामोदर विठ्ठल बारटक्के हे किराणा मालाचे दुकान सुरु होते. अत्यावश्यक सेवांसाठी आखुन दिलेल्या वेळेबाहेर दुकान अर्धवट उघडे होते. दुकानातील व्यवहार सुरु होते. अशी माहिती मिळताच गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर, तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी थेट दुकानाला भेट देवून दुकान बंद करण्याची सूचना दिली.
कारवाई होणारच
25 जणांची अँटीजेन टेस्ट केल्यावर त्यापैकी 4 जण कोरोनाग्रस्त सापडले. या चार जणांमुळे कितीजण कोरोनाच्या कचाट्यात सापडले असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तालुकावासीयांनी याचे गांभिर्य ओळखले पाहिजे. ज्यांना सर्दी,ताप, खोकला आहे अशांनी आपली कोरोना टेस्ट केली तर त्यांचे कुटुंब सुखी होईल. शिवाय वेळीच उपचार होतील. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर उपचारासाठी बाहेर पडलात तर तुम्हाला योग्य उपचारांसाठी धावपळ करावी लागेल. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी. कोरोना तपासणीनंतर प्रत्येकाला कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात हलवणे आवश्यक नसते. त्यामुळे भिती न बाळगता लक्षणे असणाऱ्यांनी कोरोना चाचणीला सामोरे जावे. जे निर्बंध मोडतील त्यांच्यावर आता थेट कारवाई होणार. हे ही लक्षात घेवून सर्वांनी कायद्याचे, निर्बंधाचे पालन करावे. असे आवाहन तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी केले आहे.
अधिकाऱ्यांच्या कारवाईचे प्रत्यक्ष छायाचित्रण