गुहागर नगरपंचायत : पाणी समिती रिक्तच रहाणार
गुहागर, ता. 03 : नगरपंचायतीच्या (Guhagar Nagarpanchyat) 4 विषय समित्यांची निवडणूक सोमवारी (ता. 4) होत आहे. उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पाणी समितीची निवडणूक पुढे ढकलावी लागणार आहे. तीन समित्यांवर नवे चेहरे येणार हे निश्चित आहे. परंतू विषय समित्यांचे सभापती कोणाला करायचे याची अनिश्चितता कायम आहे. निर्णयासाठी बैठकांची सत्रे दिवसभर सुरु होती. शहर विकास आघाडी सोमवारी सकाळी आयत्यावेळी नावांची घोषणा करुन सर्वांना धक्का देईल. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाणी समितीची निवडणूक होणार नाही
गुहागर नगरपंचायतीमध्ये पाणी समितीचे सभापती पद उपनगराध्यक्षांकडे असते. उपनराध्यक्ष सौ. स्नेहा भागडे यांनी विषय समितीच्या निवडणुकांपूर्वी राजिनामा दिला. अजुनही हा राजिनामा मंजूर झालेला नाही. परंतु त्यांना सभापती पदासाठी अर्जही करता येणार नाही. त्यामुळे पाणी समितीची निवडणूक उद्या होणार नाही.
महिला व बालकल्याण पद शिवसेनेकडून जाणार
नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेळी 2018 मध्ये शहर विकास आघाडीबरोबर शिवसेनेने युती केली होती. प्रभाग क्र. 6 मधून शिवसेनेच्या तिकीटावर कु. निलिमा गुरव निवडून आली. युतीधर्म म्हणून शहर विकास आघाडीने सत्तास्थापनेनंतर शिवसेनेच्या कु. गुरव यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पद दिले. परंतू कु. निलीमा गुरव यांचा विवाह झाला आहे. सासर मुंबईत असल्याने त्या नगरपंचायतीच्या दैनंदिन कामात लक्ष घालू शकत नाहीत. म्हणून त्यांनी सभापती पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण सभापती पद भाजपने सोडले
भाजप सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णयावर ठाम आहे. आजपर्यंत शहर विकास आघाडीने शिक्षण सभापती पद भाजपला दिले होते. आता भाजप विरोधी बाकांवर बसणार असल्याने शिक्षण सभापती पदासाठीही शहर विकास आघाडीला नाव निश्चित करावे लागणार आहे.
आरोग्य व स्वच्छता समिती
या समितीचे सभापती पदी शहर विकास आघाडीचे नगरसेवक अमोल गोयथळे यांच्याकडे होते. मात्र उद्याच्या निवडणुकीमध्ये अमोल गोयथळे आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी इच्छुक नाहीत. या पदी दुसऱ्याला संधी मिळाली अशी त्यांची इच्छा आहे.
बांधकाम समिती
या समितीचे सभापती पद माधव साटलेंकडे होते. ही महत्त्वाची समिती असल्याने हे पद कोणाला द्यायचे याबाबत शहर विकास आघाडीचा अजुनही निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादीला सभापती पद मिळणार का ?
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. गुहागर नगरपंचायतीमध्ये सौ. सुजाता बागकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव सदस्या आहेत. त्यांना उपनगराध्यक्ष पद मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आग्रही आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेकडे असलेल्या समितीचे सभापती पद देण्याचा निर्णय कदाचित होवू शकतो. सोमवारी असा धक्कादायक निर्णय होता का याची उत्सुकताही सर्वांना आहे.
नाव निश्चितीसाठी बैठकांचे सत्र
रविवारी (ता. 3) शहर विकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या अनेक बैठका दिवसभर सुरु आहेत. वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी सुरु आहे. नगरसेवकांची समजूत कशी काढायची यावर चर्चा सुरु आहे.