गुहागर, आरेगाव भंडारवाडा आणि असगोलीतील मुख्य परिसराचे निर्जंतुकीकरण
गुहागर, ता. 06 : येथील गुहागर जीमखानातर्फे गुहागर शहरासह आरेगाव भंडारवाडा आणि असगोली येथील मुख्य परिसरात सोडियम हापोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. गुहागर शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. नगरपंचायतीसह प्रशासकीय यंत्रणांकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे गुहागर जीमखानामधील सर्व सदस्यांनी शहरात औषध फवारणी केली. या उपक्रमांबद्दल शहरवासीयांनी गुहागर जीमखानाचे आभार मानले आहेत. Guhagar Gymkhana disinfected the main area of Guhagar city including Aregaon, Asgoli by spraying Sodium hypocloride.


गुहागर शहरात औषध फवारणी करावी अशी मागणी केले अनेक दिवस नागरिकांकडून होत आहे. गुहागर नगरपंचायत सध्या गृह विलगीकरणा असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या परिसरात तसेच लसीकरण केंद्रात हातपंपाने औषध फवारणी करत आहे. मात्र संपूर्ण शहरात फवारणी करण्यासाठी आवश्यक मोठा पंप, टाकी नगरपंचायतीकडे नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन, बाजारपेठेत औषध फवारणी आजपर्यंत होवू शकलेली नाही.


ही उणीव लक्षात आल्यावर आपण शहरात औषध फवारणीचा उपक्रम राबवुया अशी कल्पना अमरदिप परचुरे यांनी गुहागर जीमखानाचे अध्यक्ष नीलेश मोरे यांना सांगितली. जीमखानाच्या सदस्यांनाही ही कल्पना आवडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुहागर जीमखानातर्फे गरीब व गरजु कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले होते. तसेच शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसेल तर अनेक ग्रामस्थांना वैद्यकिय उपचारांसाठी मोफत वहातूक व्यवस्था पुरवली होती. त्यामुळे अमरदिप परचुरे यांनी सांगितलेल्या उपक्रमाची लगेचच आखणी करण्यात आली. गुहागर शहर, आरेगाव भंडारवाडा आणि असगोली येथील मुख्य परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. सुमारे 400 लिटर हापोक्लोराईड फवारण्यात आले.

