नगरपंचायतीचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
गुहागर, ता. 20 : आंतराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त गुहागर शहरातील 7.5 कि.मी.चा समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये शहरातील विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मिळून 809 हून अधिक जणांचा सहभाग होता. एकूण 3 टन 200 किलो कचरा आज संकलित करण्यात आला.

Initiative of Guhagar NagarPanchayat
सागरी सीमा मंचचे प्रांत प्रचार प्रमुख मयुरेश पाटणकर यांनी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्याकडे महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त गुहागर शहराचा संपूर्ण किनारा स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रस्ताव ठेवला. विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या सहभागीतेने आपण हे अभियान कसे यशस्वी करु शकतो या संदर्भात आराखडा त्याचवेळी तयार करण्यात आला. शहरातील नागरिक आणि संस्थांपर्यंत हा विषय पोचविण्यासाठी 10 सप्टेंबरला एक विस्तृत सभेच आयोजन व्याडेश्र्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात करण्यात आले होते. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ काटदरे आले होते.

Planning for Coast cleaning
या सभेत गुहागरच्या 7.5 कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचे भौगोलिक क्षेत्रानुसार 7 भाग करण्यात आले. सभेत सहभागी झालेल्या प्रत्येकी 2 ते 3 नागरिकांना या भागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. शहरवासीयांना नोंदणी करण्यासाठी व आपल्याला कोणत्या भागात स्वच्छता करायला आवडेल तो भाग निवडण्यासाठी नगरपंचायतीने गुगल फॉर्मची निर्मिती केली होती. या सुविधेचा फायदा सुमारे 200 नागरिकांनी घेतला.

नगरपंचायत कार्यालयात शहरातील सर्व बचतगटांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीमध्ये स्वच्छता अभियानाची माहिती दिली. सकाळच्या वेळेत येणारे नळाचे पाणी, सकाळी लवकर घरातून बाहेर पडण्यातील अडचणी यावर साधकबाधक चर्चा झाली. कोणत्या बचतगटांच्या महिलांनी समुद्रकिनाऱ्यावरील 7 भागांपैकी कोणत्या भागात जायचे याचे नियोजन करण्यात आले.

नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांकडे देखील एकेका भागाची जबाबदारी देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप, जलपान व्यवस्था, स्वच्छता मोहिमेनंतर उपहाराची व्यवस्था आणि 7 भागात संकलित झालेला कचरा उचलून प्रकल्पात नेण्यापर्यंतचे काम तत्परतेने पाहीले.

Participation of Maynak Bhandari ITI
गुहागर तालुक्यातील रानवी येथे असणाऱ्या मायनाक भंडारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने देखील पालक प्रतिनिधी समीर घाणेकर यांच्याशी संपर्क साधून किनारा स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. माजी नगरसेवक समीर घाणेकर यांनी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्याशी संवाद साधुन आयटीआयमधील 300 विद्यार्थ्यांचे समुद्रकिनाऱ्यांवरील 7 भागांमध्ये नियोजन केले. त्याचप्रमाणे खरे ढेरे महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनीही किनारा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

Participation of institutions in Beach Cleanning
किनारा स्वच्छता अभियानामध्ये सर्व महिला बचतगटांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, दुर्गादेवी देवस्थान, जीवनश्री प्रतिष्ठान, सागरी सीमा मंच, अनुलोम, व्याडेश्र्वर देवस्थान, गुहागर तालुका पत्रकार संघ अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या.

Contribution of Durga Devi Temple
शहरातील दुर्गादेवी देवस्थानने समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेला मोठे पाठबळ दिले. सुमारे 500 हॅण्डग्लोव्हज, कचरा संकलानासाठी पिशव्या, मास्क यांची व्यवस्था दुर्गादेवी देवस्थानने केली. त्याचबरोबर स्वच्छता मोहिम संपल्यावर विविध भागातील स्वयंसेवकांना चहा नाश्ता याची व्यवस्था देखील दुर्गादेवी देवस्थानने केली होती. एवढ्या मोठ्या अभियानामध्ये असे साहित्य आणि सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा खर्च येतो. मात्र दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी गुहागर नगरपंचायतीला या सर्व सेवा मोफत उपलब्ध करुन दिल्या.

Guhagar Beach Cleaning
नियोजनाप्रमाणे 20 सप्टेंबरला सकाळी 7.15 वाजता नगरपंचायतीचे कर्मचारी गुहागर शहरातील नियोजित 7 ठिकाणी पोचले होते. तेथे स्वच्छतेसाठी आलेल्या नागरिकांना त्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याचे वितरण केले. त्यानंतर सर्वांनी समुद्रकिनारा, सुरूबन याची स्वच्छता केली. कचरा संकलन करतानाच काच, रबर आणि अन्य प्लास्टीक कचरा अशी वर्गवारी करण्यात आली. सर्व ठिकाणी संकलीत झालेला कचरा नगरपंचातयीच्या कचरा संकलन वाहनांमधुन कचरा प्रकल्पापर्यंत नेण्यात आला.

Cleaning of the entire coast
गुहागर बाजारपेठत भागात पर्यटकांची वर्दळ असल्याने वर्षभरात अनेकवेळा या भागातील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता विविध सामाजिक संस्थांद्वारे केली जाते. मात्र पर्यटनदृष्ट्या विकसीत होणाऱ्या वरचापाट, बाग, खालचापाट या भागातील किनाऱ्यांची स्वच्छता आवश्यक त्या प्रमाणात होत नाही. यावेळी प्रथमच नगरपंचायतीने बाग पाचमाडपासून ते खालचापाट विसर्जन स्थळापर्यंत संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचे नियोजन केले होते. नागरिकांनीही या कल्पनेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच दोन तासांत संपूर्ण किनारा स्वच्छ झाला.
