ग्रामपंचायत प्रशासनाने दिला 50 हजाराचा दणका
गुहागर, ता. 06 : नवरदेव स्वत: कोरोनाबाधित असल्याचे लपवून बोहल्यावर उभा राहीला. सुरवातीला चौकशीसाठी आलेल्या यंत्रणेपासून वराकडील मंडळींनी सत्य दडवले. मात्र विवाह लांबला आणि चौकशीत सत्य समोर आले. नवरदेवाने स्वत:च आपण बाधित असल्याची कबुली दिली. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने 50 हजाराचा दंड ठोठावून विवाहप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांना गृहविलगीकरणात पाठविले. हा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीरमध्ये घडला. (Grapanchayat administration imposed a fine of Rs 50,000)


सडेजांभारीतील मुलाचे लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरले होते. हा विवाह 5 मे रोजी सकाळी 8.40 होता. विवाहासाठी प्रांताकडून परवानगीही घेतली होती. त्यातील अटींप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 मे रोजी कोरोना तपासणी केली.
प्रांताच्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीला प्राप्त झाली होती. आपल्या गावात कोरोनाचा प्रार्दुर्भाव होवू नये म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे कोरोना तपासणी अहवाल आधीच तपासले होते. 5 मे रोजी शीरचे सरपंच विजय धोपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी. एच. राठोड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पोलीस पाटील संदिप घाणेकर सकाळी 8.30 वाजता विवाहस्थळी गेले. वरपक्षाकडे कोराना तपासणीचा अहवाल मागितला. वरपक्षाने आम्ही तपासणी केली आहे मात्र रिपोर्ट आणले नाहीत असे सांगितले. विवाहसोहळ्यात विघ्न नको म्हणून प्रशासनाने अधिक चौकशी केली नाही. प्रांताच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा. अशा सूचना करुन ते परतले. वरपक्षाकडील कोरोना चाचणीची खातरजमा व्हावी म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांनी आबलोली प्राथमिक केंद्रात चौकशी केली. त्यावेळी नवरा कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. हे वृत्त समजताच पुन्हा एकदा प्रशासकीय पथकाने दुपारी 12 वाजता विवाहस्थळ गाठले.


वास्तविक प्रांतांनी दिलेल्या परवानगीनुसार दोन तासांत लग्न आटोपून वऱ्हाड आपापल्या गावी केले असते तर पुढील अनेक गोष्टी टळल्या असत्या. मात्र प्रशासकीय पथक आले तेव्हाही विवाहस्थळी वऱ्हाड होते. पथकाने वरपक्षाकडे चौकशी सुरु केली. दाखल्यांची मागणी होवू लागली. अखेर वराने आपण कोरोनाबाधित असल्याची कबुलीच पथकाला दिली. ही धक्कादायक बाब उघड झाल्यावर शासकीय पथकातील सदस्य भडकले. प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी देताना दिलेल्या अटी व शर्तींमध्ये दंडात्मक कारवाईचा उल्लेख होता. त्याच उल्लेखाचा आधार घेवून पथकाने विवाह लांबल्याबद्दल रु. 50 हजाराची दंडात्मक कारवाई केली. दंडाची पावती देताना त्यावर, ‘दोन तासांमध्ये विवाह पार पाडण्याची जबाबदारी दोन्ही पक्षाकडील लोकांनी पार पाडली नाही. व नवरदेव कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याने साथ रोग नियंत्रण प्रसाराबद्दल’ असा उल्लेख करत 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच नवरा मुलगा कोरोनाबाधित असल्याने सर्वांना तातडीने गृहविलगीकरणात जाण्याच्या सक्त सुचना दिल्या. या कारवाईनंतर नवरदेव कोरोनाबाधित असतानाही शीरमधील मंडळींनी वधुची सासरी पाठवणी केली आहे. सध्या नवरदेवासह सर्वजण गृहविलगीकरणात रहात आहे.

