धोपावे ग्रामविकास मंडळाने घेतली गावकऱ्यांची काळजी
गुहागर, ता. 20 : नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त मातृभुमीसोडून मुंबईच्या कर्मभुमीत रहाणाऱ्या ग्रामस्थांना गावाची कायमच ओढ असते. गणपती, शिमग्यासह अनेक सणांना त्यांचे पाय गावाकडे वळतात. त्याचबरोबर गावातील विकासकामांमध्येही या ग्रामस्थांचा मोठा सहभाग असतो. कोरोनासारख्या संकटात आपल्या जीवाभावाच्या ग्रामस्थांच्या काळजीपोटी धोपाव्यातील मुंबईकर मंडळी धावून आली. धोपावे ग्रामविकास मंडळाने कोरोनापासून गावकरी दूर रहावेत म्हणून विविध प्रकारचे साहित्य गावात पाठवून दिले आहे. गावकरी आणि मुंबईकर यांची मध्यवर्ती समिती स्थापन करुन आवश्यक मदत, मार्गदर्शनासाठी व्यासपीठ सुरु केले.
In the Corona crisis, the Mumbaikar from Dhopava helps villagers. Dhopave Gram Vikas Mandal has sent Mask, Sanitizer, Thurmal Gun etc materials to the village. To keep the villagers away from Corona. Established a central committee of villagers and Mumbaikars and started a platform for necessary help and guidance.
1975 साली मुंबईतील ग्रामस्थांनी धोपावे ग्रामविकास मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी उत्तम शैक्षणिक यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी धोपाव्यात गुणगौरव कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप केले जाते. गावातील रस्ते, वाडी बस थांबे यांच्यासाठीही देखील शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे काम ग्रामविकास मंडळाने केले आहे. अशा प्रकारे आपल्या गावातील ग्रामस्थांचे जीवन सुसह्य होण्यासाठी विविध कामे धोपावे ग्रामविकास मंडळ करत असते.
यावर्षी शिमगोत्सवात मुंबईकरांना गावात येणे शक्य नव्हते. नेहमीचा आनंद साजरा करण्यावर बंधने होती. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे सण साजरा करा. पण गर्दी करु नका असे आदेशच शासनाने काढले होते. या आदेशांमुळे मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले. तरीही गावातला सण उत्तम प्रकारे साजरा झाला पाहिजे. या भावनेतून धोपावे ग्रामविकास मंडळाने गावकरी, मानकरी, पंच यांच्याकडे N-95 मास्क, सॅनिटायझर, तापमान मोजण्यासाठी थर्मल गन हे साहित्य सुपूर्त केले. कोरोना होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी याची माहिती फोनद्वारे सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम केले. धोपावे ग्रामविकास मंडळाच्या या जनजागृतीमुळे शिमगोत्सव कोरोनाच्या विघ्नाशिवाय पार पडला.
काही काळ धोपावे गाव कोरोनापासून सुरक्षित अंतरावर होते. मात्र गुहागर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. एकेका गावात कोरोना चोरपावलाने शिरत होता. निर्बंध पाळत असलेली गावेही कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकली नाहीत. धोपावे गावाने काळजी घेवूनही एक रुग्ण बाधित झाला. ही गोष्ट मुंबईकरांना कळताच ग्रामविकास मंडळ पुन्हा गावासाठी धावून गेले. प्रत्यक्ष गावात येणे शक्य नव्हते तरीही ग्रामविकास मंडळाने दूरध्वनीवरुनच सर्व वाडीप्रमुखांची बैठक घेतली. मंडळाचे कार्यकर्ते सातत्याने वाडीप्रमुखांच्या संपर्कात राहून ग्रामस्थांची चौकशी करत होते. त्यातून मुंबईतील मंडळ आणि ग्रामस्थ यांची मध्यवर्ती समिती स्थापन झाली. या समितीच्या माध्यमातून कोरोनाविषयक काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली. औषधांची कमतरता, उपचारांसाठी मार्गदर्शन आदीसाठी ही समिती काम करत होती. ग्रामपंचायत प्रशासनाबरोबर संवाद साधल्यावर गावातील कोविड योद्ध्यांकडे साहित्याचा अभाव असल्याचे लक्षात आले. तातडीने धोपावे ग्रामविकास मंडळाने गावासाठी झटणाऱ्या आरोग्य सेविकांसाठी ५०० मास्क, ६ पिपीई-किट, १०० हॅन्ड ग्लोज, ४ फेस शिल्ड , २ व्हाईट गॉगल, ६ सॅनिटायझरच्या बाटल्या आदी साहित्य पाठवून दिले. या कामात धोपावे ग्रामविकास मंडळाचे संदीप चाळके, अनिल चव्हाण, राजेश चाळके, मनोज पवार, किशोर पवार, अनिल भुवड, बलवंत पवार, सदानंद हलापगोल, आणि कृष्णा कुळे यांनी विशेष सहकार्य केले.
Dhopave Gram Vikas Mandal sent 500 Mask, 6 PPE Kits, 100 Hand Gloves, 4 Face Shields, 2 Plan Sunglasses, 6 Sanitizer Bottles for Health Workers.
मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी, अजुनही सहकार्य लागल्यास आम्ही सदैव गावासोब असु. आपण सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करु आणि त्यात यशस्वी होवू. असे आश्र्वासन धोपावे ग्रामस्थांना दिले आहे.