आमदार भास्कर जाधव : वीज ग्राहकांना सन्मान द्या
गुहागर, ता. 07 : एक गाव एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार जाधव यांनी महावितरणचेही कान पिरगळले. वीज ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या. साचेबंद उत्तर देवून त्याला परत पाठवू नका. वीज अपघातानंतर जबाबदारी स्विकारा. अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या.
आमदार जाधव म्हणाले की, ग्राहकांच्या समस्यांकडे महावितरणने गांभिर्याने लक्ष पुरवले पाहिजे. शॉर्टसर्कीटमुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी तुम्ही घेतच नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आमची जबाबदारी पोल पासून मिटरपर्यंत. असा अहवाल देवून महावितरण ग्राहकालाच जबाबदार धरले जाते. आम्ही महावितरणचे ग्राहक आहोत. वीजमिटर महावितरणचा, वीज पुरवठा महावितरणाचा. कधी वीजेचा दाब कमी जास्त होतो. आकाशातून वीज पडते. त्यातून घरातील उपकरणे जळतात. यात ग्राहकाचा दोष काय. आमच्या घरात असलेल्या इलेक्ट्रीक फिटींगची जबाबदारीही महावितरणला घ्यावी लागेल. घरामध्ये असलेले फिटींग योग्य आहे की नाही याची तपासणी करणारी यंत्रणा उभी करावी लागेल. ज्या घरात वीज मिटर दिला जात आहे त्या घरात वापरलेली वायर योग्य गेजची आहे का, अनियंत्रीत वीजदाबाचे वेळी घरातील वीजपुरवठा खंडीत करणारी यंत्रणा ग्राहकाने उभी केली आहे का. दिलेली वीज आणि होणारा वापर यामध्ये तफावत काय आहे. त्यामुळे कोणते दोष उत्पन्न होवू शकतात. याची तांत्रिक माहिती ग्राहकाला दिली गेली पाहिजे. हा विषय इथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येत नाही हे माहिती आहे. परंतू ग्राहकांचे म्हणणे काय आहे हे महावितरणच्या अधिकाऱ्यांपर्यंत, राज्य सरकारपर्यंत पोचविणे ही येथील अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
या उपक्रमाची माहिती देताना महावितरणचे अधिकारी भाषणातून सांगत आहेत की, सदोष वीज मिटर बदलून देवू. पण मला खात्री आहे तुम्ही काहीही करणार नाही. कारण सदोष मिटरची तक्रार घेवून आलेल्या ग्राहकाला तुम्ही सांगता की पहिल्यांदा वीज बिल भर. नंतर आम्ही पहातो. तुमची ठरलेली उत्तरे असतात. ही पध्दत चुकीची आहे. त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.
हा चिमटा कोणाला ?
सध्या चिप पाप्युलिटीचे वातावरण आहे. एखादे निवेदन द्यायचे, बातमी आणि फोटो छापायचा. त्यातून लोकांना वाढत की माझ्यासारखे पुढारी काहीतरी करत आहेत. मात्र त्याची मर्यादा तितकीच असते. अशांनी धोरणात्मक प्रश्र्न सुटत नाहीत. त्यासाठीचे व्यासपीठ वेगळे असते. असा चिमटा आमदार जाधव यांनी काढला.