गुहागर, ता. 04 : शहरातील विविध संस्थांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, माजी आमदार लोकनेते रामभाऊ बेंडल यांचे धाकटे बंधू गजानन सदाशिव बेंडल यांचे ०४/०९/२०२१ रोजी सकाळी 9.30 वाजता उपचारादरम्यान डेरवण येथे निधन झाले. त्यावेळी ते 78 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गुहागरच्या ग्रामिण रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. हृदविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना डेरवण येथील रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
शिक्षकी पेशा स्विकारल्याने गजानन बेंडल हे बेंडल गुरुजी म्हणून सुपरिचित होते. शिक्षकी पेशातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. शाळा परिसरातील, त्या गावातील लोकांना त्यांनी शाळेशी जोडून घेतले होते. शाळेच्या विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असणे हे स्वाभाविक होते. पण त्याचबरोबर त्या गावातील विविध कार्यक्रमांमध्ये नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडेपर्यंत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. शासकीय कामासाठी ते मार्गदर्शन करायचे. गुहागर तालुक्यातील पहिली मुलींची शाळा गुहागरमध्ये सुरु झाली. ही शाळा सुरू करण्यामध्ये बेंडल गुरुजींचे योगदान होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रात कार्याबद्दल जिल्हा परिषद, रत्नागिरीतर्फे बेंडल गुरूजींना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गुहागर तालुक्यातील प्रत्येक सामाजिक कार्यात गजानन बेंडल यांचा सहभाग होता. कुणबी समाज संघटनचे सल्लागार, संत तुकाराम छात्रालयाच्या समितीचे सदस्य, रामभाऊ बेंडल स्मृती प्रतिष्ठान माजी अध्यक्ष व सदस्य, गुहागर बाजार सदस्य, ग्रामदेवता व्याघ्रांबरी देवस्थान पंच कमिटी सल्लागार, गुहागर ग्रामिण रूग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीचे सदस्य, तालुका समन्वय समिती सदस्य, संजय गांधी निराधार योजना सदस्य, गुहागर शाळा नं. 1 शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे.
सर्व सामान्य माणसाला पोलिस स्टेशन, तहसिलदार कार्यालय, एस. टी., पंचायत समिती, वीज कार्यालय ,भुमी अभिलेख आदी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामांसाठी सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर अशी त्यांची ओळख होती. कोणतेही सेवाभावी काम असो ते पूर्ण समर्पित व निस्वार्थी भावनेने करण्यात गुरुजींनी आयुष्याची धन्यता मानली. कधीही पदाची हाव न धरता अनेक संस्था, संघटना, मंडळे यातून त्यांनी तळमळीने काम केले.
त्यांच्या जाण्याने शिक्षक संघटनेतील मार्गदर्शक आणि कुणबी समाजाचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत. या निगर्वी, निस्वार्थी व महान कर्मयोग्याला तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली ! असा संदेश लिहून तवसाळ गटाने श्रध्दांजली अर्पण केली आहे.
गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे जीवन गौरव
9 जानेवारी 2014 ला कै. गजानन बेंडल यांना गुहागर तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्व. सुभाष गोयथळे स्मृती प्रित्यर्थ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. बेंडल गुरुजींचे सामाजिक काम, शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य यांची दखल घेत गुहागर तालुका पत्रकारा संघाने पहिल्याच पुरस्कारासाठी बेंडल गुरुजींची निवड केली होती.