गुहागर; माजी नगराध्यक्ष स्वातंत्र्यदिनी करणार उपोषण
गुहागर, ता. 6 : शहरातील पथदिप आणि हायमॅक्स दिवे यांचे काम अंदाजपत्रकाला धरुन नाही. सध्या हे दिवे बंद आहेत. चुकीच्या पध्दतीने काम करुनही नगरपंचायत प्रशासनाने या कामाचे बील मंजूर केले आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी केला आहे. या प्रकरणी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पत्र नगरपंचायतीला दिले आहे.
The work of streetlights and Hymax lights in the city does not keep up with the budget. These lights are currently off. Despite working in a wrong way, the Nagar Panchayat administration has approved the bill for this work. This allegation has been made by former mayor Jaydev More. In this case, a letter has been given to the Nagar Panchayat that he will go on a fast unto death on Independence Day.
माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी 23 मार्चला नगरपंचायत गुहागरला पत्र दिले होते. या पत्रात गुहागर खालचापाट भंडारवाडा कनगुटकर घर ते गणपती विर्सजन पाखाडी पर्यंत एलईडी स्ट्रीट लाईट बसविणे (मंजूर निधी 14 लाख 1 हजार 224) आणि नगरपंचायत क्षेत्रात एलईडी स्ट्रीट लाईट हायमॅक्स बसविणे (मंजूर निधी 31 लाख 80 हजार 55) ही कामे ठेकेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे केलेली नाहीत. पोल बॅरीकेट लोखंडी दर्जाचे असून ते गंजले आहेत. काही ठिकाणी इलेक्ट्रीक बोर्ड खुले आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडून तांत्रिक मंजुरीप्रमाणे काम करुन घेतल्याशिवाय बील देवू नये. अशी विनंती केली होती.
मात्र गुहागर नगरपंचायतीने ठेकेदाराला या कामाचे बील दिले आहे. तसेच ठेकेदाराने चुकीच्या पध्दतीने केलेल्या कामाची दुरुस्तीही नगरपंचायतीने करुन घेतलेली नाही. सद्यस्थितीत 45 लाख 81 हजार 279 रुपये खर्च करुन बसविलेले एलईडी स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स बंद आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टला नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचे पत्र माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी दिले आहे.