गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील लोक शिक्षण मंडळ संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनमहोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी समाजाने स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. Forest Festival at Abloli
यावेळी कांचन, आवळा, रिठा, जांभूळ आणि शिसम आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या परिसरात लागवडीसाठीही रोपे देण्यात आली. त्यामुळे शाळेच्या परिसरासोबतच विद्यार्थ्यांच्या घराभोवतीही हिरवाई वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. Forest Festival at Abloli
वनमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, त्यांची निगा राखण्याची पद्धत आणि पर्यावरण संतुलनातील वृक्षांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. वृक्ष लावणे ही केवळ औपचारिकता न राहता लावलेल्या रोपांचे संगोपन करणे हीच खरी पर्यावरणसेवा आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. Forest Festival at Abloli
या कार्यक्रमाला हरित सेना विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच वन अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला. शाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने चालना देऊन ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. Forest Festival at Abloli
