श्रद्धा घाडे : नवजात बालक प्रकरणी तातडीने तपास व्हावा
गुहागर, ता. 20 : नवजात बालकाला सोडून देण्याची वेळ अभागी महिलेवर आणणाऱ्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. नवजात बालकाला बेवारस सोडून देण्याची ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करुन नराधमांना कठोर शिक्षा करावी. अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली असल्याचे गुहागर तालुका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रद्धा घाडे (Guhagar Taluka BJP Mahila Morcha President Shraddha Ghade) यांनी दिली.
गुहागर तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 14 ऑगस्ट 2021 रोजी धोपावे तरीबंदर येथे फेरिबोट तिकीटघराच्या पाठीमागे खाजण भागात नवजात अर्भक सापडले होते. पोलीस खात्यातील महिला कर्मचारी आणि तालुका ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचा-यानी याची योग्य काळजी घेत या नवजाताला पुढील योग्य उपचारासाठी रत्नागीरी जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचविले. जिल्हा रुग्णालयात सुद्धा बाळावर चांगले उपचार सुरु होते. मात्र प्रसुतीचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच हे नवजात जन्माला आलेले असल्याने दुर्दैवाने त्याचा दिनांक 18 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. असे असले तरी जन्मताच बाळाला बेवारस सोडून देणे ही बाब अतिशय चिंताजनक व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्या बाळाला कोणत्या मातेने जन्म दिला ? मातृत्व देणारा पुरुष कोण ? याचा शोध लवकरात लवकर घ्यावा. तिला असे कृत्य करण्यासाठी भाग पाडणाऱ्या नराधमांना कठोर कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. हे निवेदन तहसीलदार गुहागर आणि गुहागर तालुका पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.


काळीज पीळवटून टाकणाऱ्या या घटनेचा गांभिर्याने विचार करून समाजातील प्रभावी आणि जबाबदार नागरीकांनीही या हॄदय हेलाउन टाकणा-या घटनेच्या तपासकार्यात शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या गुहागर तालुका अध्यक्षा श्रीमती श्रद्धा घाडे यांनी केले आहे. यावेळी नगरसेविका सौ. मृणाल गोयथळे, सौ. अमृता जोशी, सौ. स्नेहा बारटक्के आदी महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.