अवैध दारूविक्रीवर कारवाईची नागरिकांची मागणी
गुहागर, ता. 25 : शृंगारतळी येथील पालपेने फाटा परिसरात संध्याकाळी दोन मद्यप्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. भररस्त्यात सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेत या मद्यप्यांना चोप दिला आणि त्यांच्यातील भांडण वेळीच मिटवले. Drunkards rioting in the streets
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पालपेने फाटा येथे असलेल्या एका अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावरून हे दोघे जण दारू पिऊन बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. शृंगारतळी येथे आठवडा बाजार असल्याने परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ होती. गजबजलेल्या वेळेत हा प्रकार घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी उसळली. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी आपली वाहने थांबवून हा धिंगाणा पाहिल्याने वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला होता. Drunkards rioting in the streets

या घटनेमुळे परिसरातील अवैध दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या दुकानामुळे मद्यपी वारंवार दारू पिऊन धिंगाणा घालत असतात. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, तसेच महिलांना या मद्यप्यांचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो. या घटनेनंतर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून, परिसरातील शांतता बिघडवणाऱ्या या बेकायदेशीर गावठी दारू विक्रेत्यावर प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे. Drunkards rioting in the streets
