गुहागरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकारी गमावला
अतिशय हसतमुख खूप शांत असे व गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे मितभाषी डॉक्टर अरुण बाबुराव देवाळे यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले त्यावेळी ते 47 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक मुलगी, वडिल असा परिवार आहे
साधी राहणीमान असलेले डॉक्टर अरुण देवाळे यांच्या खाजगी दवाखाना मुळे नरवण सारख्या ग्रामीण भागात रुग्णांना दिलासा मिळाला होता. वडिल बाबुराव देवाळे वैद्यकिय सेवा पुरवित असतं. त्यामुळे वैद्यकिय क्षेत्राची आवड असलेल्या अरुण देवाळे यांनी डॉ. मोकल यांच्या दापोलीतील महाविद्यालयात वैद्यकिय शिक्षण घेतले. आणि वडिलांचा आरोग्य सेवेचा वसा पुढे सुरु ठेवला. सोमवारी सकाळी ते कोरोना वरील उपचाराकरिता चिपळूणमधील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. बुधवारपर्यंत उपचार घेतल्यानंतर अधिक उपचाराकरिता पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये गुरुवारी पहाटे चार वाजता दाखल झाले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले.
गुहागर तालुका मेडिकल असोसिएशनचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यामुळे तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी रविवारी दिवसभर ओपीडी बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. अशी माहिती डॉक्टर राजेंद्र पवार यांनी दिली
अरुण एक दिलदार दोस्त : डॉ. वैभव गाडगीळ
वैद्यकिय शिक्षणासाठी सहा वर्ष डॉ. अरुण देवाळे आणि डॉ. वैभव गाडगीळ एकत्र रहात होते. स्वाभाविकच अरुण देवाळेंच्या सोबत असलेल्या अनेक आठवणींचा चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर तरळला. आता दोस्ताच्या आठवणींसोबतच जगावे लागणार ही कल्पना आजही त्यांना सहन होत नाही. डॉ. वैभव गाडगीळ म्हणाले 23 वर्षांपूर्वी ज्या घरमालकाकडे आम्ही सहा वर्ष राहीलो ते खोत देखील आम्ही भेटल्यावर भावनिक व्हायचे. डॉ. अरुण देवाळे घरमालकांची भेट घेवून निघताना हुंदके देत बाहेर पडत असतं. त्या सहा वर्षात एकत्र रहात असूनही आम्ही एकही दिवस भांडलेला नाही. कॉलेजमधुन खोलीवर येताना अरुण एकमेकांनी समान ओझं उचलूया असे सांगत दोघांकडे समान वह्यापुस्तक घ्यायचा. महाविद्यालयीन जीवनापासून आजपर्यंत माझ्या सर्व सुखदु:खाच्या क्षणांमध्ये अरुणचा सहभाग होता. कायम मदतीसाठी तयार असलेला अरुण माझ्या वडिलांच्या आजारपणापासून ते दशक्रियाविधीपर्यंत माझ्या सोबत होता. महाविद्यालयात उत्कृष्ट भालाफेकपटू, कॅरमपटू आणि नाटकात काम करणारा कलाकार अशी त्याची ओळख होती. पण नरवण आल्यावर जबाबदारी वाढु लागल्यावर तो आवडींपासून दूर गेला. नरवणसह दोडवली, वाघांबे येथेही अरुण वैद्यकिय व्यवसाय करत असे. एक सज्जन डॉक्टर अशी त्याची नरवण पंचक्रोशीत ओळख होती. अरुण देवाळेच्या निघून जाण्याने मी माझ्या निष्पाप, भाबड्या, सज्जन मित्राला गमावून बसलो आहे.