आरजीपीपीएल : व्यवस्थापनाबरोबरच्या चर्चेतून निघाला तोडगा
गुहागर, ता. 16 : सुरक्षेच्या कारण पुढे करुन सोमवारपासून (ता. 15) रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य करण्यात आले. मात्र या सुविधेचा वापर न्यायालयात पुरावे देण्यासाठी केला जाईल या भितीने स्थानिक कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रीक थम्बला विरोध केला. अखेर सायंकाळी 5 ते रात्री 12पर्यंत चाललेल्या बैठकीनंतर हा वाद शमला आहे.
येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीने सुरक्षेसंदर्भात शासनाने दिलेल्या सुचनांप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब अनिवार्य केले. या निर्णयाची अंमलबजावाणी 15 मार्चपासून करण्यात आली. त्यामुळे केंद्रीय औद्योगिक बलाच्या सुरक्षाकर्मींनी बायोमेट्रीक थम्बशिवाय कोणालाही कंपनीच्या आवारात जाण्यास परवानगी दिली नाही. या विषयाला दाभोळ वीज कंपनीपासून कायमस्वरुपी नोकरीत असलेल्या कामगारांनी विरोध केला.
अखेर सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्थानिक कामगारांसोबत आरजीपीपीएल कंपनी व्यवस्थापन आणि युपीएल व्यवस्थापनाने चर्चा केली. या चर्चेत कामगार प्रतिनिधींनी बायोमेट्रीकला आमचा विरोध नाही. मात्र त्याचा दुरुपयोग पुराव्यासाठी केला जाणार नाही. याची हमी कंपनीने द्यावी. अशी मागणी केली. तसेच आपल्या वकिलांचा सल्ला घेतला. अन्य सोयीसुविधांबाबत विचारणा केली. त्यानंतर कामगारांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन बायोमॅट्रीक थम्ब स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळपासून बायोमॅट्रीक थम्बसाठी नोंदणी प्रक्रिया युपीएलद्वारे पूर्ण करुन कामगार कामावर जाऊ लागले आहेत.