एकेकाळी महाविद्यालयीन तरुणांच्या दुनियादारीतील दोस्त म्हणून ओळख असलेल्या दिपकचे आज कोरोनाच्या आजारात निधन झाले. गुहागर शहरात भाजी आणि फळ विक्रेता म्हणून दिपक ज्ञानदेव फडतरे सर्वांना परिचित होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, 3 बहिणी, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.
आजची सकाळ दिपकाच्या अकाली निधनाच्या वृत्तानेच सुरु झाली. गुहागर शहरातील दुसरा तरुण व्यापारी आज अचानक निघुन गेला. निशब्द भावना आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याच स्मरण करताना दिपकचा फेसबुकवरी फोटो सारखा मन:पटलावर येत होता. पत्नी आणि दोन इवल्या इवल्या मुलांचा आधार अचानक हात सोडून निघुन गेला आहे. असाच इवलासा दिपक फडतरे वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी काकांचे बोट धरुन गुहागरात आला होता. बालपणी शाळा सुटल्यावर मुले जेव्हा मैदानावर खेळायला धावायची तेव्हा दिपक गुहागरच्या बसस्थानकावर उसाच्या रसांनी भरलेले ग्लास भरुन एस.टी.च्या वाटोळा फिरायचा. आपण आल्याची वर्दीही एऽऽऽ रस्सऽऽवालेऽऽए अशी असायची. नवनाथ रसवंती गृहाचे मालक तुकाराम फडतरे हे त्याचे काका. पण दोघांच नातं इतकं घट्ट अनेकजण दिपकला तुकाराम काकांचा मुलगाच समजायचे. तर त्यांच बालपण हे असं शाळा आणि एस. टी. स्टॅण्ड यांच्या एवढ्याच विश्वाचं होत. मला वाटतं दिपक दहावीपर्यंत शिकला. पुढे कॉलेजवैगरे करण्याचा विचारच त्यांच्या मनाला शिवला नव्हता. कष्ट आणि मेहनतीनं कमवायला शिक्षण कशाला हवं असाच त्याचा आविर्भाव असायचा. आपल्या मित्रांखेरीज गुहागरकरांमध्ये फारसा वावरला नाही त्यामुळे त्याच्याविषयी फार कोणाला माहिती नव्हती. मात्र 10 वी नंतर दिपकचं जग बदललं.
त्याच्या काकांनी एस. टी. स्टॅण्डवर चालवायला घेतलेल्या गोळ्या बिस्कीटांचे दुकान दिपक सांभाळू लागला. या दुकानामुळे, दिपकही या मुलांच्या बरोबरीचा असल्याने आणि त्याच्या स्वभावामुळे बसस्थानकावर येणाऱ्या अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींशी त्यांची दोस्ती जमली होती. या दोस्तांचा गप्पांचा अड्डा म्हणजे एस.टी.स्टॅण्ड. अशा गप्पांच्या मैफीलीत दिपकने अनेक मित्रांचे वाढदिवस गोळ्या वाटून आणि रस प्यायला देवून साजरे केले आहेत. त्याचबरोबर गुहागर आगारातील चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांसोबतही दिपकची दोस्ती होती. एखाद्याचा डबा, घेतलेली एखादी वस्तू, गाडीवर पाठवायचे टपाल अशा अनंत गोष्टी दिपकच्या दुकानात असायच्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पास काढणे, आरक्षणे करुन देणे, आदी कामे तो विना मोबदला करुन द्यायचा.


2013 दिपकने हे दुकान सोडून स्वत:चा भाजी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. एस.टी.स्टॅण्डबाहेर विहीरीजवळ हे नवे दुकान थाटले. हे दुकानही छान चालायचे. मापापेक्षा थोडी अधिक देणारा भाजीवाला म्हणून त्याची ओळख बनली होती. रसवंती गृहात काम करणारा दिपक दुकानाचा मालक म्हणून ओळखला जावू लागला होता. आर्थिक स्थैर्यही आले होते. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिपकने भाजीसोबत फळ विक्रीही सुरु केली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पत्नी आणि दोन गोंडस मुले असा संसारही सुरळीत सुरु होता. पण आज अचानक कोरानारुपी वादळात दिपकच निधन झालं. कुटुंबाती एक सदस्य कोरानाग्रस्त झाल्यावर खरतरं सर्वांनीच कोरोना तपासणी करुन घेतली होती. सर्वांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह होती. मात्र चार दिवसांनी दिपकला चक्कर आली म्हणून त्यांने पुन्हा कोरोना चाचणी केली. या चाचणीत दिपकला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. मधुमेह असल्याने डॉक्टरांनी दिपकला ताबडतोब रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. म्हणून तो शृंगारतळीमधील कोविड रुग्णालयात दाखल झाला. तेथे उपचार सुरु असतानाच मंगळवारी दिपकची तब्येत अचानक बिघडू लागली. शरिरिातील ऑक्सिजनची पातळी 50 पेक्षाही खाली येऊ लागली. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला नातेवाईकांनी त्याला चिपळूणला नेले. मात्र तेथे ऑक्सिजन बेड मिळाला नाही. अन्य ठिकाणी ऑक्सिजन बेड शोधेपर्यंत दिपकचे निधन झाले.