रत्नागिरी, ता. 15 : तौक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थांनी कोणती काळजी घ्यावी. वादळापूर्वी काय करावे याच्या सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी सर्वांनी करावी. असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
तौक्ते वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शन सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. तालुक्यातील सागरी किनाऱ्यांवरील व आसपासच्या सर्व गावांमधील नागरीकांनी दि. 14 मे ते 18 मे या कालावधीत सतर्क राहायचे आहे. किनारपट्टीच्या आसपासच्या गावातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील विज जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तात्काळ आपल्या घरात आवश्यक इतके मेणबत्ती/आगकाडी बॉक्स/केरोसीन/टॉर्च/बॅटरी/शुष्कघट इ साहित्य तयार करुन ठेवावेत. चक्रीवादळामुळे झाडे उन्मळुन व तुटुन पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरीकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडुन घ्यावीत. सर्व नागरीकांनी आवश्यक रेशनची आपल्या कुटुंबासाठी व्यवस्था करुन ठेवावी. संकटकालीन वापराकरिता कोरडे व खराब न होणारे खादयपदार्थ खबरदारीचे उपाय म्हणूण तयार ठेवावेत. लहान मुले, वृद्ध व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा. ग्राम कृती दल व ग्रामपंचायती यांनी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने चक्रीवादळ व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत दवंडी, रिक्षा फिरवुन, सोशल मिडीयाचा वापर करुन प्रचार प्रसिध्दी करावी. प्रत्येक गावस्तरावर जे.सी.बी, वुड कटर पोहणारे व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, स्वयंसेवक इ ची मोबाईल नंबरसह यादी तलाठी व ग्रामपंचायत यांचेकडे तयार करण्यात यावी व त्यांचे संपर्कात राहावे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पुरेशा पिण्याची पाण्याची सोय, पाणी शुध्दीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निर्जंतूकीकरण पावडर, उपलब्ध करुन घ्यावे. नागरीकांनी जादा पिण्याचे पाणी घरात सुरक्षीत जागी साठवुन ठेवावे. सदर चक्रीवादळाच्या कालवधीत कोणीही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी, पोहण्यासाठी समुद्रात जाणार नाहीत याची दक्षता ग्राम कृती दल व ग्रामपंचायतीने घ्यावी. अफवांवर विश्वास ठेऊ नये, अफवा पसरवु नये. कोणत्याही परिस्थितीत घबराटाची स्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शंका असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष (02352-226248) किंवा रत्नागिरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षात ( 02352-223127 ) फोन करावे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच रत्नागिरीचे आमदार व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 15 मे रोजी रात्री 8 वा. जिल्हावासीयांसाठी एक संदेश दिला आहे. या संदेशाचा हा व्हिडिओ जरुर पहावा.