वेळणेश्वरच्या डॉ. चंद्रशेखर गाडगीळांचा भन्नाट प्रयोग, केंद्र सरकाकडून पेटंट प्रमाणपत्र प्राप्त
गुहागर, ता. 12 : एकाच विहिरीत दोन जलाशयांची निर्मिती करुन पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी साठवणुकीची क्षमता सिध्द करणारा एक भन्नाट प्रयोग गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरच्या डॉ. चंद्रशेखर गाडगीळ या संशोधकाच्या कल्पनेतून साकारला आहे. त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला जणू मान्यताच मिळाली असून केंद्र सरकारकडून त्यांना यासाठी पेटंट प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. गुहागर तालुक्यातील हा अभिनव प्रयोग देशपातळीवर कौतुकास्पद ठरला आहे. Creation of a two-level reservoir in a well
राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो मात्र, सच्छिद्र जांभा पाणी धरुन ठेवत नाही. डोंगराळ प्रदेशमुळे पाणी वेगाने ओढ्यानद्यांमार्गे खाडी, समुद्रात वाहून जाते. तसेच पावसाळ्यानंतर भूजल पातळीही झपाट्याने खाली जाते. परिणामी, मुबलक पाणी असूनही दरवर्षी कोकणाला पाणीटंचाईची झळ बसते. यावर उपाय म्हणून एक भन्नाट संकल्पना मनात आणून वेळणेश्वरचे निवृत्त प्राध्यापक व संशोधक डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांनी यावर एक प्रयोग केला. त्यांचा हा कल्पक उपाय अभियांत्रिकी आणि नवनिर्मितीची साक्ष देणारा ठरला आहे. Creation of a two-level reservoir in a well

डॉ.गाडगीळ यांनी या प्रयोगाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, एका सामान्य विहिरीला भूजल आणि पावसाचे पाणी दोन्ही साठविण्यासाठी सहजी दोन पातळ्यांवर रुपांतरीत करता येते ती म्हणजे बहुस्तरीय साठवण विहिरीची रचना. विहिरीच्या तळाशी असलेला नैसर्गिक स्रोत म्हणजे झऱ्यापासून आलेल्या पाण्याचा साठा म्हणजे पहिला जलाशय. या पाण्याच्या वरच्या विहिरीच्या रिकाम्या भागात एक भक्कम काँक्रीटचा स्लॅब टाकून जणूकाही विहिरीत एक मजलाच तयार होतो, यालाच विहिरीची विभागणी म्हणतात. याच स्लॅबच्या वर बांधलेली साठवण टाकी म्हणजेच दुसरा जलाशय. यामध्ये पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या विहिरीचे तसेच टाकीत पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवता येते. एवढेच नाही तर अधिक पाणी साठविण्यासाठी लगतच्या मोकळ्या जमिनीवर म्हणजेच दुसऱ्या स्तरावर विहिरीतील टाकीभोवती वर्तुळाकार टाकीही बांधली. या सगळ्याची देखभाल करण्यासाठी एक प्रवेशनलिका तयार केली. ही एक अशी सोय आहे की, ज्यामुळे वरच्या पाण्याला हात न लावता थेट खालच्या विहिरीतील जलाशयापर्यंत जाता येते. त्यामुळे विहिरीतील पाणी पंपाने सहज काढता येते. विहिरीत घातलेला विभागणीचा मधला स्लॅब मात्र मजबूतच हवा कारण पावसाळ्यात तुडुंब भरणाऱ्या विहिरीतील पाण्याचा प्रचंड दाब. तसेच विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्यावर वरच्या टाकीतील लाखो लिटर पाण्याचा दाब. हे दोन्ही दाब सहन करण्याची ताकद या स्लॅब मध्ये असावी लागते. तसेच विहिरी लगतच्या मोकळ्या जागेवर आतल्या टाकीला समांतर भिंत बांधून दुसरी टाकी निर्माण करता येते व या दुसऱ्या स्तरावरही पाण्याची साठवण होते. Creation of a two-level reservoir in a well
वेळणेश्वरमध्ये एका विहिरीमध्ये व भोवती मिळून सुमारे ३ लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. या सुधारित विहिरीत जे पाणी दरवर्षी समुद्राला वाहून जायचे त्यातील दोन लाख लिटर पाणी विहिरीच्या आतल्या मजल्यात म्हणजे जलाशयात आणि एक लाख लिटर पाणी दुसऱ्या मजल्यावरील म्हणजेच जमिनीवरच्या गोल टाकीत साचते. यासाठी अतिरिक्त जागेचा वापर करण्यात आला नसल्याचे सांगून त्यांच्या प्रयोगाचा इतरांनी सुद्धा त्यांच्या असलेल्या विहिरीत सुधारणा करून लाभ घ्यावा व पावसाळ्यानंतर शेतीसाठी अथवा अन्य गरजांच्या पूर्ततेसाठी या पाण्याचा वापर करावा असे त्यांनी आवर्जून सांगितले. Creation of a two-level reservoir in a well
या प्रयोगाचा फायदा
पावसाचे साठविलेले अतिरिक्त पाणी सिंचनासाठी उपयोगाला येते. जिथे बागायतदार, शेतकरी एक पीक घ्यायचे तिथे या पाण्यावर दोन पिके घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले. या बहुस्तरीय विहिरीमुळे अस्तित्वात असलेल्या विहिरीचा वापर, पर्यावरणावर कमी परिणाम, भूजल आणि पर्जन्यजल संयुक्त संचयनाचा वापर, अत्यंत उपयुक्त असल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. डॉ. गाडगीळांच्या मार्गदर्शनाखाली मिस्त्री राजेंद्र भुवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. Creation of a two-level reservoir in a well