समर्थ भंडारी पतसंस्थेने दिले बळ, 150 विद्यार्थ्यांचे उद्दीष्ट
गुहागर, ता. 08 : शहरातील लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान (Loknete Sadanand Arekar Pratisthan) आणि श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे (Shree Samarth Bhandari Patsanstha) कोविड पालक अभियान (Covid Parent Program) राबविण्यात येणार आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीतही गरीब, होतकरु विद्यार्थ्यांचे (Economically Backward Student) शिक्षण सुरु रहावे. यासाठी कोविड पालक अभियानाद्वारे शैक्षणिक साहित्य (Educational Material) दिले जाणार आहे.
या अभियानाचे औपचारीक उद्घाटन गुहागर पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे यांच्या उपस्थितीत पार पडले. कोविड पालक अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या साहित्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी अभियानाची माहिती देताना आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर म्हणाले की, एप्रिल 2020 मध्ये कोविडमुळे देशात टाळेबंदी ( Lockdown) जाहीर झाली. दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा राज्यात टाळेबंदी जाहीर करावी लागली. यामुळे सर्वांचीच आर्थिक गणिते चुकली आहेत. हातावर पोट असलेली जनता विवंचनेत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील हुशार परंतू गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये यासाठी आरेकर प्रतिष्ठानने कोविड पालक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था या अभियानामध्ये आमच्यासोबत आहे. या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. गरजु विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून मदत घेतली जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांच्या नावांची निश्चिती केली जाणार आहे. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाईल. शिवाय शिक्षणासाठी आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता विद्यार्थ्यांला आहे. याची माहिती घेवून पूर्तता करण्याचा प्रयत्न आरेकर प्रतिष्ठान आणि श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था करेल. तालुक्यातील सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांना मदतीचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. भोसले, गटशिक्षणाधिकारी जगदाळे, पंचायत समिती सदस्य सुनील पवार, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, जिल्हा खरेदी विक्री संघ अध्यक्ष पद्माकर आरेकर, म.सा.प. गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, विजय मोहिते, आरेकर प्रतिष्ठानच्या महिला विभाग प्रमुख सौ.स्वाती कचरेकर, प्रसन्न कणगुटकर, रोहित मालप, रोहित खातू, सुरज चव्हाण, प्रथमेश घाडे आदी उपस्थित होते.