प्रशासनासमोर तीन जागांचा पर्याय, जी 13 ग्रुप चालवणार रुग्णालय
गुहागर, ता. 16 : तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉजसह अली पब्लिक स्कुल व पालपेणे रस्त्यावरील एक नवी इमारत असे तीन पर्याय शासनासमोर आहेत. यातील एक जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही तालुका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे यापैकी एकाही जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
District Government taken decision to start Paid Covid Hospital and Dedicated Covid Health Centre in Guhagar Tahsil. DCHC started in Ruler Hospital with Oxygen Bed. But No concrete decision has been taken regarding any space for Paid Covid Hospital


बुधवारी (ता. 14) सायंकाळी राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन अशा टप्प्याने बैठकीचे सत्र पार पडले. या बैठकींनंतर गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला. त्याची अंमलबजावणी ग्रामीण रुग्णालयाने सुरु केली. या आदेशाबरोबरच जिल्हा प्रशासनाने गुहागर तालुक्यात प्रायव्हेट पेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्याचे आदेशही दिले.


गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गुहागरमधील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या 13 डॉक्टरांनी एकत्र येत रेनबो लॉज, शृंगारतळी येथे पेड कोविड हॉस्पिटल तयार केले होते. मात्र या ठिकाणी केवळ दोन रुग्णांवरच उपचार झाले. त्यानंतर कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने हे हॉस्पिटल बंद पडले. त्यामुळे सुमारे 5 लाख रुपयांचा तोटा झाला. जी 13 ग्रुपमधील प्रत्येक डॉक्टरांनी हा तोटा आपल्या खिशाला चाट देवून भरुन काढला. या पार्श्वभुमीमुळे गुहागर तालुक्यातील डॉक्टरांनी तालुका प्रशासनाला आम्ही सर्वोतोपरी मदत करु मात्र जागा घेण्याचे आर्थिक गणित आम्ही जुळवू शकत नाही. अशी भुमिका मांडली. त्यामुळे गुहागर तालुक्यात हॉस्पिटल नसल्याने तालुका प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी व वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने हे हॉस्पिटल सुरु करण्याचे ठरले.
पेड कोविड हॉस्पिटलला जागा निश्चित करण्यासाठी गुरुवारी (15 एप्रिलला) गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चरके, जी 13 ग्रुपमधील दोन डॉक्टर व अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या टिमने तीन जागा पाहिल्या. यापैकी एक जागा ताब्यात घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रही तालुका प्रशासनाकडे होते. मात्र सदर जागेचे सुमारे 1 लाखाचे महावितरणचे देयक भरलेले नव्हते. त्यामुळे महावितरणने या इमारतीची वीज तोडली आहे. शिवाय कोविड महामारीमुळे ही इमारत वर्षभर बंद आहे. हा तोटा सहन न झाल्याने मालक चिंतेत आहे. अशा परिस्थितीत जागा मालकाशी संपर्क झाल्याशिवाय जागा ताब्यात घेणे माणुसकीला धरुन नसल्याने या जागेचा विषय टीमने मागे ठेवला. पालपेणे रोडवर एक नवी इमारत बांधुन पूर्ण आहे. तेथे बोलणी सुरु झाली. ही बोलणी अंतिम टप्प्यात असताना स्थानिकांनी वस्तीत कोविड हॉस्पिटल नको अशी विनंती केली. शृंगारतळीतील आणखी एका जागेसंदर्भात प्रशासन बोलणी करत आहे. मात्र 15 एप्रिलला सायंकाळपर्यंत कोणत्याच जागेसंदर्भात ठोस निर्णय झालेला नाही.