गुहागर, ता. 29 : आरोग्य विभागीतील कोविड योद्धे समाजासाठी देवदूत आहेत. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला. तालुक्यातील कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण समितीच्या बैठकीत आज आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नाटेकर बोलत होते.
(Mahesh Natekar Said Corona Warriors are angels for society)
गुहागर तालुक्यातील कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण समितीची बैठक पार पडली. यावेळी कोरोना आपत्तीच्या काळात योगदान देणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, माध्यम प्रतिनिधी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्धा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांनी रुग्ण कल्याण समितीच्या मागील सभेचे ठरावानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तळागाळात जाऊन सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून काम करणाऱ्या आपल्या सहकारी बांधवांचे डॉ. जांगीड यांनी कौतुक केले.
सत्कार समारंभात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि कोळवली रुग्ण समितीचे अध्यक्ष महेश नाटेकर म्हणाले की, गेले वर्षभर कोविड विरुध्दच्या लढाईत आरोग्य विभाग फ्रंटलाईनवर उभा राहून लढत आहे. म्हणून या सर्वांना कोविड योद्धा संबोधले जाते. ही लढाई लढाताना वैद्यकिय अधिकारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींनी कोरोना रुग्णांना शोधुन, त्यांच्या उपचार करण्याचे काम केले. शिवाय कोरोना पसरु नये म्हणून जनजागृती केली. या लढाईत योद्ध्यांनी स्वत:सोबत आपल्या कुटुंबाचीही पर्वा न करता झोकून देऊन काम केले. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एल. चरके, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम. के. पी. सातपुते, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनंत मोहिते, रवींद्र गावडे, उपसरपंच अजित भुवड, पत्रकार अमोल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, डॉ.सतीश तांबे यांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पुरोहित यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पालशेतकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कार्यक्षेत्रातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.