अजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा !
गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता प्रशासनाला जाणवत आहे. एका बाजुला अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्याकडून अपेक्षित कामाला प्रतिसाद मिळत नाही. तर दुसऱ्या बाजुला ग्राम कृतिदले अजुनही सक्रीय होत नाहीत. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवणे, संपर्कातील व्यक्ति शोधणे, कोरोना सदृष्य व्यक्तिंना तातडीने मदत मिळवून देणे, परगावातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी आदी अनेक कामे मार्गी लागलेली नाहीत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण कसे मिळवायचे या प्रश्र्नाने तालुका प्रशासन त्रस्त आहे.
गुहागर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर स्वरुप धारण केले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या दिशेकडे वाटचाल करत आहे. मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा मार्च 2021 ते एप्रिल 2021 मधील कोरोना मृत्यूंची संख्या अधिक आहे. आज तालुक्यात सापडणाऱ्या कोरोना बाधितांमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. पहिल्या लाटेत गुहागरमध्ये कोविड केअर सेंटर सोडून अन्य कोणतीही व्यवस्था नव्हती. परंतु एप्रिल 2021 मध्ये सशुल्क कोविड रुग्णालय, ऑक्सिजनची सुविधा असलेले कोरोनाला समर्पित आरोग्य केंद्र (ग्रामीण रुग्णालय) या सुविधांची निर्मिती केली गेली आहे. 14 एप्रिलपासून निर्बध लावण्यात आले. तरीही कोरानाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.


तालुका कोरोनाग्रस्त
आजही तालुकावासीयामध्ये कोरोनाच्या प्रसाराबद्दल गांभिर्य नाही. सध्याचा कोरोना विषाणू अधिक घातक आहे. अवघ्या 7 दिवसांत रुग्ण अत्यवस्थ होतो. त्यावेळी रुग्णाचे नातेवाईक धावपळ करतात. कोरोनाचा संसर्ग झाल्यास सुरवातीला येणारा ताप, एक किंवा दोन दिवस होणारी सर्दी, खोकला, अंगदुखी, चक्कर येणे आदी लक्षणांकडे रुग्ण दुर्लक्ष करतो. साधारणपणे चौथ्या, पाचव्या दिवशी दम लागला, छाती भरुन आली, अंगदुखी – डोकेदुखी वाढली की रुग्ण खासगी डॉक्टरकडे जातो. ते डॉक्टर औषधे देताना कोरोना तपासणीचा सल्ला देतात. मात्र हा सल्ला रुग्ण नाकारतो. मग सातव्या आठव्या दिवशी कोरोना आपले प्रताप दाखवू लागला की रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ सुरु होते. परंतू पहिल्या पाच दिवसात कोरोना संसर्ग झाल्यावरही रुग्ण घरात आणि बाहेर फिरतो. त्यातून तो आपल्या कुटुंबाला देखील अडचणीत टाकतो. आज गुहागर तालुक्यात संपूर्ण कुटुंब बाधीत झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
फारशी लक्षणे नाहीत अशा रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. आजही असे रुग्ण वाडीत, गावात बिनधास्त फिरतात. गावातील लोकांना भेटतात. त्यातूनही कोरोना पसरत आहेत. याशिवाय आज अनेक ठिकाणी घरातील व्यक्तिचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. अशावेळी सदर घरातील व्यक्ती कोरोनाने गेली नाही (दुसऱ्याच आजाराने गेली) असे सांगितले जाते. वयोवृध्द कोरोनाग्रस्ताला रुग्णालयात दाखल करावे लागले तर धावपळ कोण करणार म्हणून उपचार करणे टाळले जाते. हे तालुक्यातील वास्तव आहे.
कोरोनाचा हा प्रसार थांबवणे जनतेच्या हातात आहे. त्यातून आपले कुटुंब, आपली वाडी कोरोनापासून वाचणार आहे.


प्रशासन त्रस्त
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला मदत करण्यासाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका धावून आल्या होत्या. अनेक शिक्षक पोलीसांना मदत करत होते. तर अंगणवाडी सेविका गावातील आशा सेविका, आरोग्य सेवक /सेविका यांना मदत करत होते. आज शिक्षकांना संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे काम देण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे हे बदललेले काम करण्यास शिक्षक तयार नाहीत. गुहागर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनीही कोरोना योद्धा म्हणून काम करण्यास नकार दिला आहे.
आरोग्य सुविधांच्या बाबतीत गुहागर तालुका पूर्वीपासूनच मागास आहे. तालुक्यात एकही रुग्णालय नाही. त्यामुळे सशुल्क कोविड रुग्णालयाच्या निर्मितीमध्येही तालुका प्रशासनाला लक्ष घालावे लागले. आज असलेले एकमेव रुग्णालय कमी पडेल अशी भिती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे आणखी एका रुग्णालयाची निर्मिती गुहागरात होणे आवश्यक आहे.
पहिल्या लाटेत कोरोना संकटाशी दोन हात करण्याकरीता ग्राम कृतीदलांनी चांगले काम केले. परगावातून गावात येणाऱ्यां लोकांसाठी विलगीकरण कक्षांची निर्मिती केली. गावात सभासमारंभ होणार नाहीत याची काळजी घेतली. गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद प्रशासनाला मिळत होती. कोरोनाच्या संकटातही गावगाडा निट चालेल याची काळजी ग्राम कृती दले घेत होती. मात्र आज वेळोवेळी आवाहन करुनही ग्राम कृती दले सक्रीय झालेली नाहीत. गावात कोण येतो, कधी जातो, कुठुन आला याची माहिती घेतली जात नाही. अशावेळी ही मंडळी कोरोनाचाचणीशिवाय अन्यत्र फिरतात.
दुसऱ्या संकटात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बाजारपेठा बंद असल्यातरीही नोंद घेण्याजोगी रहदारी प्रत्येक गावात असते. सकाळी 7 ते 11 बाजारपेठा उघडतात त्यावेळी शृंगारतळीसारख्या बाजारपेठते गर्दी होते. या साऱ्या गोष्टींना आवरण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आज प्रशासनाकडे नाही. त्यामुळे कोरानाचा प्रसार वाढून त्याचा ताण प्रशासनावर दिवसेंदिवस वाढत आहे.
हे असेच चालू राहीले तर गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती आजच्या पेक्षा भयानक होणार हे निश्चित आहे. जेव्हा खऱ्या अर्थाने कोरोना रौद्ररुप धारण करेल त्यावेळी कितीही काळजी घेतली तरी होणारे दुष्परिणाम न टाळता येणारे असतील. त्यावेळी हतबल प्रशासन आणि शोक करणारी जनता असे चित्र उभे राहु शकते. म्हणूनच म्हणावेसे वाटते