अखेर नगरपंचायतीने केले अंत्यसंस्कार, शववाहिनी नसल्याने अन्य वाहनाचा वापर
गुहागर, ता. 21 : येथील ग्रामीण रुग्णालयात गिमवीतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या व्यक्तिच्या घरातील अन्य ५ कुटुंबिय देखील कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे मृतदेह नगरपंचायतीने ताब्यात घेण्याची आवश्यकता होती. मात्र सुरवातीला ही जबाबदारी नगरपंचायत टाळत होती. शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा विषय थेट जिल्हाधिकारी, आमदार यांच्यापर्यंत पोचवला. पुन्हा एकदा शववाहिनीचा विषय चर्चेत आला. अखेर नगरपंचायतीने मृतदेह ताब्यात घेवून त्यावर अंत्यसंस्कार केले.
गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयातून कोरोनाग्रस्त वृध्दाचा मृतदेह त्रिशुळसाखरी ग्रामस्थांच्या ताब्यात दिल्यानंतर नगरपंचायत गुहागर जबाबदारी का टाळतय याची चर्चा प्रशासनात आणि तालुक्यातही सुरु होती. त्यातच मंगळवारी रात्री गिमवीतून रुग्णालयात दाखल झालेल्या 68 वर्षीय प्रताप जाधव यांचा बुधवारी सकाळी 9.15 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे अन्य 5 कुटुंबीय देखील कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे मृतांवर अत्यंसंस्कार कोण करणार असा प्रश्र्न होता. गिमवीतील ग्रामस्थांनी कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाग्रस्त मृतावर स्थानिक स्वराज्य संस्थेने अंत्यसंस्कार केले पाहिजेत हा मुद्दा पुढे आला. मात्र सदर रुग्ण गिमवीतील असल्याने अंत्यसंस्कारांची जबाबदारी नगरपंचायत टाळत होती. ही माहिती कळताच शिवसैनिकांनी तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक, आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करुन नगरपंचायतीने ही जबाबदारी उचललीच पाहिजे असा आग्रह धरला. युवासेना तालुका अधिकारी अमरदिप परचुरे यांनी थेट जिल्हा तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधून ग्रामीण रुग्णालयात मृत होणाऱ्या कोरोनाग्रस्तांवर अत्यंसंस्कार कोणी करायचे, ही जबाबदारी कोणाची अशी विचारणा केली. माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे व युवासेना शहर अधिकारी राकेश साखरकर यांनी आमदार भास्कर जाधव यांना या विषयाची माहिती दिली. यावेळी शिरीष बागकर, तुषार सुर्वे, कल्पेश बागकर, दिपक शिरधनकर हे उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मिळाल्या.
या सूचनांनंतर नगरपंचायत प्रशासनाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो पण मृतदेह नेण्यासाठी शववाहिनीची मागणी केली. तालुक्यात शववाहिनीची उपलब्धताच नसल्याचा प्रश्र्न पुन्हा एैरणीवर आला. मृतदेह कोरोनाग्रस्ताचा असल्याने स्वतंत्र चालक कक्ष असलेले व पूर्णत: बंद वाहनच उपलब्ध होत नव्हते. अखेर नगरपंचायतीने ग्रामीण रुग्णालयाची जूनी रुग्णवाहिकाच वापरुन सहा तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
पित्याला अग्नी देण्यास मुलाचा नकार
ग्रामीण रुग्णालयातून नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सदर मृतदेह गुहागरच्या स्मशानभुमीत आणला. तत्पूर्वी मुंबईतून आलेल्या मुलगा आणि सुनेला अग्नी देण्यासाठी येणार का अशी विचारणा करण्यात आली. दोघांनाही पीपीई किट देण्याची व्यवस्था देखील नगरपंचायतीने केली होती. मात्र कोरोनाच्या संकटात जन्मदात्या पित्याला अग्नी देण्यासही मुलाने नकार दिला. अखेर गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीच सदर मृतदेहाला भडाग्नी दिला.