गुहागर ता. 28 : अश्विन शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक २८/२९ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतात दिसणारे हे या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण आहे. ग्रहण स्पर्श २८ ला रात्री (२९ उजाडता) ०१.०५ मी. असून ग्रहण मध्य रात्री ०१.४४ आणि ग्रहण मोक्ष रात्री ०२.२३ वा. आहे. ग्रहण पर्वकाळ १ तास १८ मिनिटे असून हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. Continental Lunar Eclipse
ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल.
पुण्यकाळ – ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ आहे.
ग्रहणाचा वेध – हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी शनिवारी सायंकाळी ७.४१ पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करु नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येतील. ग्रहण पर्वकाळात म्हणजे रात्री १.०५ ते रात्री २.२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत.
ग्रहणातील कृत्ये – ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये झोप, मलमुत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्मे करु नयेत. सोहेर, सुतक असता ग्रहणकालात ग्रहणा संबंधी स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल – मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभफल, सिंह, तुला धनु, मीन या राशिंना मिश्रफल, मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीन अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. Continental Lunar Eclipse