पतन विभागाच्या भोंगळ कारभाराचा ठेकेदाराला फटका
गुहागर, ता. 20 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १४ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छिमार जेटीचे काम अद्यापही गटांगळ्याच खात असल्याचे समोर आले आहे. पतन विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका ठेकेदाराला बसला असून झालेल्या कामाचे बीलही ठेकेदाराला मिळालेले नसल्याची माहिती ठेकेदार खामकर यांनी दिली. Construction of Sakhri Agar Jetty remains stalled
साखरीआगर भागातील मच्छिमारांची गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी जेटीला २०१०-११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी तिच्या बांधकामाला २.९६ कोटी इतकी प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. २०१२ मध्ये या जेटीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काम सुरु झाल्यानंतर सीआरझेडची परवानगी नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत सोडले होते. Construction of Sakhri Agar Jetty remains stalled
जेटीचे बांधकाम गेली १२ वर्षे रखडल्याने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा सुरु करुन सीआरझेडची परवानगी मिळवून ८ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर केला होता. यानंतर में. खामकर कंपनी यांना जुलै 2023 मध्ये वर्कआँर्डर मिळाली. नोव्हेंबरमध्ये त्यांनी जेटीचे काम सुरु केले. मात्र, जेटीच्या बांधकामात अनेक अडथळे आले आहेत. ही जेटी चुकीच्या जागीच घेण्यात आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात काळा कातळ असून समुद्रापर्यंत जेटीचे बांधकाम कसे करायचे असा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे. जेटीकडे जाणारा रस्ताही नसून त्या सीआरझेडची परवानगीच नाही. आजपर्यंत ठेकेदाराला झालेल्या कामाचे बीलही मिळालेले नसून हा मंजूर निधी अन्य कामांकडे वळविल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे. Construction of Sakhri Agar Jetty remains stalled
साखरीआगर येथील मच्छिमारांना जेटी नसल्याने वर्षानुवर्षे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. जेटी नसल्याने होड्या नांगरणे, मासे उतरविणे शक्य होत नसल्याने परिणामी, रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये त्यांना आपल्या होड्या उभ्या करुन ठेवाव्या लागतात. त्यामुळे साखरीआगर ते जयगड हा प्रवास तसेच डिझेल वाहतूक करणे या सर्व बाबी फारच खर्चिक असल्याने त्यांचे फारच नुकसान होते. त्यामुळे या पावसाळ्यानंतर तरी जेटीचे काम होईल, अशी अपेक्षा मच्छिमारांना होती मात्र, ती फोल ठरली असून शासनाच्या या उदासिनतेविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Construction of Sakhri Agar Jetty remains stalled
