पालकमंत्री अनिल परब, अडचणी दूर झाल्यावर बीचशॅक्स योजना होणार कार्यान्वित
गुहागर, ता. 12 : एस.टीने स्वत:चे पेट्रोलपंप लोकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी या संदर्भात तेल कंपन्यांबरोबर आम्ही करार केला आहे. त्यामुळे पुढच्या काळात गुहागरमधला पेट्रोलपंपाचा विषय मार्गी लागेल. असे प्रतिपादन परिवहनमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी केले. ते पोमेंडी येथे पत्रकारांशी बोलत होते.
पोमेंडीतील भुमिपुजनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अनिल परब आले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी पेट्रोलपंप, बीचशॅक्स योजना, पुरातन मंदिराना निधी, शिमगोत्सव या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. परब म्हणाले की, एस.टी.चे खासगीकरण करण्याचा आमचा विचार नाही. मात्र एस.टी.पेट्रोलपंप जनतेसाठी खुले करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे लोकांचा डिझेल, पेट्रोलचा प्रश्र्न सुटेल. राज्यातील एस.टी.चे अनेक पेट्रालपंप हे मोक्याच्या ठिकाणी आहेत. आत्तापर्यंत हे पेट्रोलपंप केवळ एस.टी.साठीच वापरता येत होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी इंडियन ऑईल कंपनीशी आम्ही करार केला आहे. त्याप्रमाणे हे पेट्रोलपंप चालविण्याची जबाबदारी एस.टी.चीच राहील. प्रायोगिक तत्त्वावर कोणते पेट्रोलपंप लोकांसाठी सुरु करायचे हे आजही ठरलेले नाही. येत्या काळात अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेताना ज्या तालुक्यांमध्ये पेट्रोलपंप नाहीत त्या ठिकाणांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
जिल्हा नियोजनसाठी 210 कोटींचा निधी आला आहे. हा निधी नक्कीच मागील वर्षापेक्षा जास्त आहे. हा निधी कुठे खर्च करायचा याचा विचार जिल्हा नियोजनच्या बैठकीत केला जाईल. राज्यातील पुरातन मंदिरे पर्यटन स्थळे म्हणून विकसीत करण्याची आमची योजना आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पुरातन मंदिरे पर्यटन खात्याकडे आम्ही घेतोय. पर्यटनमधुन त्यांचा जीर्णोध्दार करण्यासाठी निधी देण्याचा विचार आम्ही करतोय. बीच शॅक्स योजनेमध्ये काही छोट्या छोट्या अडचणी आहेत. त्यादूर करुन ही योजना कार्यान्वित होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु करत आहोत. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना बाकीच्या ठिकाणी लागू करण्यात येतील. शिमगोत्सवासंदर्भात कोणते निर्णय घ्याचे याचे अधिकारी स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन याबाबतीतील निर्णय घेईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.